तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 06:44 IST2025-11-13T06:42:13+5:302025-11-13T06:44:24+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक ६७ ते ७६ जागा मिळतील असा अंदाज 'ॲक्सिस माय इंडिया' या एक्झिट पोल एजन्सीने वर्तवला आहे. परंतु, १२१ ते १४१ जागा मिळवत एनडीएचीच सत्ता येईल, असा अंदाजही या संस्थेने वर्तविला आहे.

तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज
नवी दिल्ली - बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक ६७ ते ७६ जागा मिळतील असा अंदाज 'ॲक्सिस माय इंडिया' या एक्झिट पोल एजन्सीने वर्तवला आहे. परंतु, १२१ ते १४१ जागा मिळवत एनडीएचीच सत्ता येईल, असा अंदाजही या संस्थेने वर्तविला आहे. भाजपला ५० ते ५६, जदयूला ६२ ते ६५, काँग्रेसला १७ ते २१, व्हीआयपीला ३ ते ५, डाव्या पक्षांना १० ते १४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.
टुडेज चाणक्यने एनडीएला बहुमत
'टुडेज चाणक्य' या एक्झिट पोलने भाजपप्रणित एनडीए आघाडीला घवघवीत यश मिळेल असा दावा केला आहे. जनसुराज्यची सुरुवात अत्यंत वाईट आहे. मतांची टक्केवारी पाहता एनडीएला ४४ तर महाआघाडीला ३८ टक्के मते मिळतील. अन्य पक्षांना १८ टक्के मिळतील असा दावा आहे.
राज्यात सत्ता कोणाची? महिला ठरवणार!
- राज्यातील विधानसभेच्या २४३ जागांसाठी झालेल्या एकूण ६६.९१ टक्के मतदानात पुरुषांचा वाटा ६२.८ टक्के, तर महिलांचा वाटा हा ७१.६ टक्के आहे. पुरुषांपेक्षा मतदान करणाऱ्या महिलांची संख्या ८.८ टक्के जास्त असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
- निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात एकूण ६५.०८ टक्के मतदान झाले. यात महिला मतदारांची संख्या ६९.०४, तर पुरुष मतदारांची संख्या ६१.५६ टक्के होती. दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढून ते ६८.७६ झाले.
- यात ७४.०३ टक्के महिलांनी, तर ६१.०१ टक्के पुरुषांनी मतदान केले. दोन्ही टप्प्यांतील एकून मतदानाची आकडेवारी पाहिल्यास महिलांनी केलेले मतदान ७१.६, तर पुरुषांचे मतदान ६२.८ टक्के झाले आहे. राज्यात एकूण मतदान ७ कोटी ४५ लाख २६ हजार ८५८ आहे.
भाजपकडून ५०१ किलो लाडवांची ऑर्डर
बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री असल्याने निकालापूर्वीच भाजपने ५०१ किलो लाडूंची ऑर्डर दिली आहे. निवडणुकीच्या निकालादिवसी या लाडूंचे वाटप केले जाणार आहे.
बिहारमध्ये शुक्रवारी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलने एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. आम्हाला विजयाची खात्री असल्याचा दावा भाजप कार्यकर्ते कृष्णकुमार कल्लू यांनी केला.