गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 17:38 IST2025-10-05T17:37:46+5:302025-10-05T17:38:49+5:30
TamilNadu Zoo: वन अधिकारी आणि झू कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली.

गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
Tamil Nadu Zoo: तमिळनाडूच्या वंडलूर प्राणीसंग्रहालयातून (Arignar Anna Zoological Park) एक सिंह बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या सिंहला दिवसा सफारी क्षेत्रात फिरण्यासाठी सोडले होते, पण संध्याकाळी तो परत आपल्या पिंजऱ्यात आलाच नाही. या घटनेने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे.
सफारीसाठी सोडलेला सिंह शनिवारी उशिरापर्यंत परत न आल्याने वन अधिकारी आणि झू कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार, हा सिंह गुजरातच्या चक्करबाग प्राणीसंग्रहालयातून राष्ट्रीय पशुविनिमय कार्यक्रमांतर्गत तामिळनाडूत आणण्यात आला होता.
वंडलूर पार्कमधील सिंहांची स्थिती
चेंगलपट्टू जिल्ह्यातील वंडलूर झूमध्ये एकूण 6 सिंह आहेत. त्यापैकी दोन सिंहांना एकावेळी सफारी झोनमध्ये पर्यटकांसाठी सोडले जाते, तर उर्वरित चार सिंहांना वेगवेगळ्या पिंजऱ्यांत ठेवले जाते. हा नवीन सिंह याच आठवड्याच्या सुरुवातीला सफारी विभागात पहिल्यांदा सोडण्यात आला होता.
वंडलूर प्राणीसंग्रहालयाबद्दल माहिती
हे १५०० एकरांहून अधिक क्षेत्रफळावर पसरलेले दक्षिण आशियातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय आहे. येथे २,४०० पेक्षा जास्त प्राणी आणि पक्षी आहेत. सिंह, वाघ, अस्वल, हत्ती, जिराफ, हरण, रानगवा या प्राणीसंग्रहालयातील प्रमुख आकर्षण आहेत.
विशाखापट्टणममधून आनंदाची बातमी
विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी प्राणीसंग्रहालयात दोन पिल्लांचा जन्म झाला आहे. ही घटना देशाच्या प्रजनन आणि संवर्धन कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. प्राणीसंग्रहालयाच्या क्युरेटर जी. मंगम्मा यांनी सांगितले की, “आई आणि पिल्लांची काळजी व्हेटरनरी टीम घेत आहे. हा जन्म आमच्या संवर्धन प्रयत्नांचा यशस्वी टप्पा आहे.”
दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजाती
एशियाई सिंह आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना (IUCN) ने संकटग्रस्त म्हणून घोषित केली आहे. तसेच भारताच्या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूची–I मध्ये यांचा समावेश आहे, म्हणजेच त्यांचे संरक्षण सर्वोच्च स्तरावर केले जाते.