Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:18 IST2025-09-28T12:16:12+5:302025-09-28T12:18:10+5:30
Tamilnadu Stampede And Actor Vijay : अभिनेता थलपती विजयला आपलं भाषण थांबवावं लागलं. चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ३९ वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. अनेक लोक जखमीही झाले आहेत.

Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
तामिळनाडूतील करूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. चेंगराचेंगरी झाली. मोठ्या गर्दीमुळे अनेक लोक बेशुद्ध पडले. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून अभिनेता थलपती विजयला आपलं भाषण थांबवावं लागलं. चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ३९ वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. अनेक लोक जखमीही झाले आहेत.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन काल रात्री करूर येथे पोहोचले आणि त्यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची आणि मेडिकल कॉलेजमध्ये जखमींची भेट घेतली. "आपल्या राज्याच्या इतिहासात, एका राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी कधी जीव गमावलेले नव्हते आणि भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा कधीही घडू नये. सध्या ५१ जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. जड अंतःकरणाने मी जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
"अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
"मृतांच्या नातेवाईकांना २० लाख आणि जखमींना २ लाख"
करूर दुर्घटनेबद्दल अभिनेता थलपती विजयने दुःख व्यक्त केलं. विजय म्हणाला की, हे खूप मोठं नुकसान आहे आणि कोणतेही शब्द हे दु:ख कमी करू शकत नाहीत. मात्र कुटुंबातील सदस्य म्हणून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रुपये आणि जखमींना २ लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. अभिनेत्याने सर्व जखमींसाठी प्रार्थना केली आणि त्यांना आश्वासन दिलं की तामिळनाडू विजय असोसिएशन आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत आहे.
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
सरकारनेही जाहीर केली मदत
तामिळनाडू सरकारने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने विजय याच्या करूर रॅलीतील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. तर चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी तात्काळ एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याची घोषणा तामिळनाडू सरकारने केली आहे.