Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:56 IST2025-11-12T12:52:38+5:302025-11-12T12:56:01+5:30
Tamil Nadu Accident: तामिळनाडूमध्ये पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
तामिळनाडूमध्ये पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात मंगळवारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली, ज्यात एका भरधाव वेगातील पोलिसांच्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलाचाही समावेश आहे. शिवगंगा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिव प्रसाद यांनी या घटनेची माहिती दिली आणि पोलिसांच्या वाहनामुळे हा अपघात झाल्याचे मान्य केले.
Sivaganga, Tamil Nadu | Three members of a family, including a two-year-old boy, were killed after their two-wheeler collided head-on with a police vehicle in Sivaganga district on Tuesday. The deceased were identified as Prasad (25), his wife Sathya (20) and their son, Ashwin…
— ANI (@ANI) November 12, 2025
प्रसाद (वय २५), त्याची पत्नी सत्या (वय, २०) आणि त्यांचा मुलगा अश्विन (वय, २) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब अनांजीयुर येथून नातेवाईक सोनई ईश्वरी (वय,२५) यांना घेऊन गावी परतत असताना सक्कुडीजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रामनाथपुरम जिल्हा पोलिसांच्या भरधाव वेगाने येणाऱ्या एका पोलीस वाहनाने प्रसाद यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला. सत्या आणि त्यांचा मुलगा अश्विन यांना रुग्णालयात नेत असताना त्यांनी वाटेतच प्राण सोडले. नातेवाईक सोनई ईश्वरी या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर सरकारी राजाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.