तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 06:00 IST2025-10-12T05:59:49+5:302025-10-12T06:00:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी नारीशक्तीच्या घोषणा देत असतात, पण महिलांप्रती असा भेदभाव असताना त्यांच्या घोषणा किती फोल आहेत, हे दिसून आल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधानांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले.

तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
नवी दिल्ली : अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्या शुक्रवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याच्या घटनेवर काँग्रेससह अन्य विरोधकांनी केंद्र सरकारवर तीव्र हल्ला चढविला आहे. ही घटनाच महिलांचा अपमान करणारी असून, ती अजिबात स्वीकार्य नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नारीशक्तीच्या घोषणा देत असतात, पण महिलांप्रती असा भेदभाव असताना त्यांच्या घोषणा किती फोल आहेत, हे दिसून आल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधानांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले.
महिला पत्रकारांच्या सहभागावर कोणतीही बंदी नाही
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दारुल उलूम देवबंद भेटीपासून महिला पत्रकारांना दूर ठेवावे अशा कोणत्याही सूचना अफगाणिस्तान परराष्ट्र खात्याच्या कार्यालयाने दिलेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण दारुल उलम देवबंदने दिले आहे. या संदर्भातल्या कार्यक्रमात महिला पत्रकारांसाठी जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. पडदा किंवा बुरखा ठेवला नव्हता अशी माहिती देवबंदच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
पत्रकारांकडून निषेध
तालिबानच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना मज्जाव केल्याचा निषेध ‘द इंडियन वुमेन प्रेस कॉर्स्पस’ने केला आहे. महिलांप्रती हा भेदभाव असून, सरकारने हे प्रकरण ताबडतोब अफगाणिस्तान दूतावासापर्यंत नेले पाहिजे, असे संघटनेने म्हटलेले आहे.
शुक्रवारच्या घटनेवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, सागरिका घोष, उद्धव ठाकरे सेना गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या महिलांनीही कडक शब्दांत टीका केली आहे.
‘आमचा सहभाग नाही’
भारताच्या परराष्ट्र खात्याने या घटनेबाबत हात झटकत तालिबानने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत भारत सरकारचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले. अफगाणिस्तानचा दूतावास भारताच्या कायदेशीर भौगोलिक क्षेत्रात येत नाही, असे भारताने स्पष्ट केले.