माझ्यावर काहीही कारवाई करा, मी शेतकऱ्यांच्या बाजूने लढणार; राहुल गांधी यांचे थेट प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:08 IST2026-02-13T09:08:01+5:302026-02-13T09:08:41+5:30
भारत-अमेरिका व्यापार कराराद्वारे शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात घातल्याचा आरोप

माझ्यावर काहीही कारवाई करा, मी शेतकऱ्यांच्या बाजूने लढणार; राहुल गांधी यांचे थेट प्रत्युत्तर
नवी दिल्ली : "माझ्यावर सरकार गुन्हा दाखल करो किंवा विशेषाधिकार हनन प्रस्ताव आणा, मी शेतकऱ्यांच्या बाजूने लढतच राहणार," असे ठाम प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले.
राहुल यांनी 'एक्स' व त्यांच्या व्हॉट्सॲप चॅनेलवर व्हिडिओ जारी करत म्हटले, ''कोणताही असा व्यापार करार जो शेतकऱ्यांची उपजीविका हिरावून घेईल वा देशाची अन्नसुरक्षा कमकुवत करेल, तो शेतकरी-विरोधी आहे. शेतकरीविरोधी सरकारलाअन्नदात्यांच्या हिताशी तडजोड करू देणार नाही.'' राहुल गांधी यांनी पंतप्रधान केंद्र सरकारवर आरोप करत, भारत-अमेरिका व्यापार कराराद्वारे शेतकऱ्यांची उपजीविका आणि देशाची अन्नसुरक्षा धोक्यात घातली जात असल्याचा दावा केला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आता रस्त्यापासून संसदेपर्यंत लढा उभारणार आहेत.
भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात विरोधकांची संसद परिसरात निदर्शने
भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारावर गुरुवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने करत केंद्र सरकारचा निषेध केला. हा करार करताना केंद्र सरकारने अमेरिकेसमोर समर्पण केल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला. यावेळी खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संसदेच्या मकर द्वाराजवळ झालेल्या निदर्शनात काँग्रेसचे, द्रमुकचे, सपाचे, सीपीआय-एमएलच्या खासदारांसह विरोधी पक्षाचे अनेक खासदार सहभागी झाले होते.
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द करा, निशिकांत दुबे यांची मागणी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करावे व त्यांना आयुष्यभर निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवावे, या मागणीसाठी त्यांच्या विरोधात आपण मूलभूत प्रस्ताव मांडण्यासाठी नोटीस दिल्याची माहिती भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी गुरुवारी दिली. राहुल गांधी सोरोस फाउंडेशन, यूएसएआयडी, फोर्ड फाउंडेशनशी हातमिळवणी करून परदेशात जातात, भारतविरोधी शक्तींशी संगनमत करतात, असे या नोटिशीत दुबे यांनी म्हटले आहे.
'फाशी जाण्यासही तयार आहोत'
राहुल गांधी यांच्याविरोधात दुबे यांनी मूलभूत प्रस्ताव मांडण्यासाठी नोटीस दिल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आम्हाला कोणत्याही प्रस्तावांची भीती नाही. फाशी द्यायची असेल तरी आम्ही त्यासाठीही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळेच आम्ही त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची नोटीस दिल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले.