राज्यसभेत ३७ जागांवर डावपेच! निकालात भाजपा-काँग्रेसला होईल फायदा मग फटका कुणाला बसणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:57 IST2026-02-19T12:56:11+5:302026-02-19T12:57:19+5:30
महाराष्ट्रापासून बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह १० राज्यांतील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या जागा एप्रिल महिन्यात रिक्त होत आहेत

राज्यसभेत ३७ जागांवर डावपेच! निकालात भाजपा-काँग्रेसला होईल फायदा मग फटका कुणाला बसणार?
नवी दिल्ली - देशातील १० राज्यांमधील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम घोषित केला. त्यात २६ फेब्रुवारीपासून ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १६ मार्च सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. त्याचदिवशी संध्याकाळी निकाल घोषित केला जाईल. भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांची राजकीय ताकद राज्यसभेत वाढणार असेल तर त्यात कुणाचं राजकीय नुकसान होणार हे जाणून घेऊ.
महाराष्ट्रापासून बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह १० राज्यांतील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या जागा एप्रिल महिन्यात रिक्त होत आहेत. ज्यासाठी निवडणूक आयोगाने १६ मार्चला मतदान करण्याचं जाहीर केले आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएच्या जागा वाढतील तर विरोधी इंडिया आघाडीच्या जागांमध्ये घट होईल. परंतु काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे(SP) प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी आणि ठाकरेंच्या प्रियंका चतुर्वैदी यांचा कार्यकाळ संपणार आहे. याव्यतिरिक्त उपसभापती हरिवंश सिंह, उपेंद्र कुशवाह यांचीही मुदत संपणार आहे. निवृत्त होणाऱ्या दिग्गज नेत्यांची पुन्हा एन्ट्री होणार का हे पाहणे गरजेचे आहे. राज्यसभेच्या या ३७ जागांमध्ये सर्वाधिक ७ जागा महाराष्ट्रातल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपाच्या २, शरद पवारांच्या पक्षातील २ आणि काँग्रेस, उद्धवसेना आणि आरपीआयची प्रत्येक १ जागा रिक्त होणार आहे. तामिळनाडूत ६ जागा रिक्त होतील. त्यातील ४ डिएमकेजवळ आहेत. १ जागा एआयडिमके आणि एक टीएमसीकडे आहे. पश्चिम बंगाल, बिहारमध्ये ५-५ जागांवर निवडणूक होईल. बंगालमध्ये ५ पैकी ४ जागांवर टीएमसी आणि एका जागेवर सीपीआयचा कब्जा आहे. बिहारच्या ५ जागांवर जेडीयू आणि आरजेडीकडे प्रत्येकी २ जागा आणि १ जागा आरएलएलकडे आहे.
ओडिशा येथे ४, आसामध्ये ३ जागा रिक्त होत आहेत. ओडिशातील ४ जागांपैकी २ जागा भाजपा आणि बीजेडीकडे २ जागा आहेत. आसामच्या ३ राज्यसभा जागांपैकी २ भाजपाकडे आणि एक जागा आसाम गड परिषदेकडे आहे. हरियाणा, छत्तीसगड, तेलंगणाहून २-२ जागा आणि हिमाचल प्रदेशात एका जागेवर मतदान होणार आहे. हरियाणातील दोन्ही जागा भाजपाकडे आहेत. तेलंगणात २ जागांपैकी काँग्रेस १, बीआरएस १ अशा जागा आहेत. छत्तीसगडमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसचा कब्जा आहे. हिमाचल प्रदेशातील एका जागेवर भाजपाचा कब्जा आहे.
राज्यसभेत कुणाला फायदा अन् कुणाला नुकसान?
देशातील एकूण ३७ जागांपैकी आकडेवारी पाहिली तर भाजपा नेतृत्वातील एनडीएकडे जवळपास १५ जागा आहेत. ज्यात भाजपाकडे ९, जेडीयू २, एआयडिएमके १, आरएलएम आणि आरपीआयकडे १ जागा आहे. विरोधी इंडिया आघाडीकडे १८ जागा आहेत. ज्यात काँग्रेसकडे ४ जागा, टीएमसी ४, डिएमके ४ आणि आरजेडीकडे २ जागा आहेत. सीपीआय आणि उद्धवसेनेकडे प्रत्येकी १ जागा आहे. इतरांकडे ४ जागा आहेत. ज्यात बीजेडीकडे २, बीआरएस १ आणि तामिळनाडूच्या स्थानिक पक्षांकडे १ जागा आहे. विधानसभा निवडणूक निकालांमुळे अनेक राज्यात गणिते बदलली आहेत. ज्यामुळे एनडीएला २ ते ३ जागांचा फायदा मिळू शकतो. काँग्रेसच्या ४ जागा वाढून ५ होऊ शकतात. भाजपाच्या ९ जागा वाढून १२ होण्याची शक्यता आहे. आरजेडी, शरद पवारांची एनसीपी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या हातून जागा जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एनडीएकडे २३५ आमदार आहेत. त्या जोरावर ६ जागा सहजपणे जिंकू शकतात. भाजपा ४, शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. हरियाणा आणि हिमाचलमुळे काँग्रेसची १ जागा वाढू शकते.