"गृहयुद्ध टाळायचे असेल तर..."; UGC च्या नव्या गाइडलाइन्सवरून रामभद्राचार्य यांचा सरकारला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 17:15 IST2026-02-21T17:14:32+5:302026-02-21T17:15:53+5:30
"देशाला गृहयुद्धासारख्या परिस्थितीपासून वाचवायचे असेल, तर सरकारला हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मागे घ्यावाच लागेल," असा इशारा स्वामी रामभद्राचार्य यांनी दिला आहे.

"गृहयुद्ध टाळायचे असेल तर..."; UGC च्या नव्या गाइडलाइन्सवरून रामभद्राचार्य यांचा सरकारला थेट इशारा
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नवीन मार्गदर्शक तत्त्वांवरून देशभरात मोठा वैचारिक वाद निर्माण झाला आहे. यातच आता, जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी उत्तर प्रदेशातील बस्ती येथे रामकथेदरम्यान केंद्र सरकारवर कडक शब्दांत प्रहार केला. "देशाला गृहयुद्धासारख्या परिस्थितीपासून वाचवायचे असेल, तर सरकारला हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मागे घ्यावाच लागेल," असा इशारा स्वामी रामभद्राचार्य यांनी दिला आहे.
काय म्हणाले स्वामी रामभद्राचार्य? -
जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणाले, जोवर आपण धर्माचार्य पदावर आहोत, तोवर हा कायदा लागू होऊ देणार नाही. UGC च्या या नव्या नियमांची गरजच काय होती? समाजात भेदभाव का केला जात आहे?" असा सवालही त्यांनी यावेळी केला. देशाला गृहयुद्धासारख्या परिस्थितीपासून वाचवायचे असेल, तर सरकारला हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मागे घ्यावाच लागेल, असेही ते म्हणाले.
'ब्राह्मण कधीही जातिवादी नव्हता' -
यावेळी त्यांनी ब्राह्मण समाज आणि जातिवासंदर्भातही भाष्य केले. 'ब्राह्मण कधीही जातिवादी नव्हता', असे सांगताना त्यांनी निषाद राजाला आदर देणाऱ्या गुरु वशिष्ठांच्या महानतेचाही उल्लेख केला. गुरु वशिष्ठांनी केवळ राजपुत्रांनाच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला समान आदर आणि शिक्षण दिले, असे ते म्हणाले. तसेच, त्यांनी पुन्हा एकदा बस्ती जिल्ह्याचे नाव बदलून 'वशिष्ठ नगर' करण्याची मागणीही केली.
#WATCH | Lucknow, Uttar Pradesh: People stage a protest against the UGC guidelines at Parivartan Chowk. The police force has been deployed at the spot. pic.twitter.com/22KffWdK8G
— ANI (@ANI) February 21, 2026
लखनऊमध्ये 'सवर्ण मोर्चा'च्या बॅनरखाली UGC कायद्याविरोधात निषेध मोर्चा -
दुसरीकडे, लखनऊमध्ये शनिवारी 'सवर्ण मोर्चा'च्या बॅनरखाली UGC कायद्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. हा 'काळा कायदा' मागे घ्यावा, अशी मागणी करत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. या आंदोलनात पदाचा राजीनामा दिलेले SDM अलंकार अग्निहोत्री देखील सहभागी झाले होते. हातामध्ये फलक घेऊन त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. परिवर्तन चौक ते गांधी पुतळ्यापर्यंत शेकडो लोकांनी गर्दी केली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून लखनऊमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.