स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची प्रकृती खालावली, प्रयागराज माघ मेळ्यात थंडीमुळे शंकराचार्य आजारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 17:32 IST2026-01-23T17:30:45+5:302026-01-23T17:32:47+5:30
शंकराचार्यांचे वय आणि सध्याची प्रकृती पाहता त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारांची आणि देखरेखीची गरज असल्याचे मत समर्थकांनी व्यक्त केले आहे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची प्रकृती खालावली, प्रयागराज माघ मेळ्यात थंडीमुळे शंकराचार्य आजारी
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आहे. कडाक्याच्या थंडीत उघड्यावर बसल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकराचार्यांची प्रकृती खालावली असतानाही, अद्यापपर्यंत कोणत्याही डॉक्टरांकडून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही. यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये अथवा समर्थकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.
शंकराचार्यांचे वय आणि सध्याची प्रकृती पाहता त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारांची आणि देखरेखीची गरज असल्याचे मत समर्थकांनी व्यक्त केले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत मेडिकल बुलेटिन किंवा प्रशासनाकडून अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. तसेच, त्यांची प्रकृती नेमकी किती गंभीर आहे, हे देखील अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
खरे तर, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती अस्वस्थ असल्याची बातमी पसरताच त्यांच्या अनुयायांकडून ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे. याचबरोबर, त्यांच्या प्रकृतीबाबतची नेमकी माहिती मिळावी, यासाठी डॉक्टरांच्या विशेष पथकाद्वारे त्यांची लवकरात लवकर तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे.
सध्या प्रयागराजमध्ये संगम तटावर माघ मेळा सुरू आहे, मौनी अमावस्येच्या दिवशी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यासोबत झालेल्या गोंधळाचा वाद अद्यापही शमण्याचे नाव नाही. स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि मेळा प्राधिकरण यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. मेळा प्रशासनाकडून त्यांना आतापर्यंत दोन नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. स्वामींनी या दोन्ही नोटिसांना उत्तर दिले असून ते मागे हटण्यास तयार नाहीत.