घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:10 IST2025-06-27T12:57:18+5:302025-06-27T13:10:33+5:30
Crime News: घरात पतीने ठेवलेल्या कागदपत्रांमध्ये काही बनावट आणि संशयास्पद कागदपत्रे सापडल्याने आपला पती देशद्रोही तर नाही ना? अशी शंका आलेल्या महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना समोर आली आहे.

घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल
घरात पतीने ठेवलेल्या कागदपत्रांमध्ये काही बनावट आणि संशयास्पद कागदपत्रे सापडल्याने आपला पती देशद्रोही तर नाही ना? अशी शंका आलेल्या महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यामध्ये एका महिलेने तिच्या पतीविरोधात देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
शामली जिल्ह्यातील सरवर पीर गावातील हे संपूर्ण प्रकरण असून, येथील मनीषा नावाच्या महिलेने तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने सांगितले की, तिच्या पतीचं नाव इंतजार असं असून, तो गेल्या अडीच वर्षांपासून घरी आलेला नाही. तसेच फोरवरही बोलत नाही. एकेदिवशी तिने घरातील कागदपत्रे चाळली असता त्यामध्ये तिच्या पतीची वेगवेगळ्या नावांनी तयार केलेली कागदपत्रे आणि शाळेची प्रमाणपत्रे सापडली. या कागदपत्रांवर तिच्या पतीचे फोटोही लावलेले होते. एवढंच नाही तर इंतजार याने एका मौलवीकडून आपण अविवाहित असल्याचं प्रमाणपत्रही तयार करून घेतलेलं आहे. वास्तवात त्याला दोन मुलगे आहेत.
पतीची वेगवेगळ्या नावांनी असलेली आधारकार्ड आणि गुणपत्रके सापडल्यावर मनीषा हिला धक्का बसला. तिने ही बाब आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर मनीषा आणि तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. यावेळी मनीषा हिने या कागदपत्रांवरून तिचा पती देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच अशा कृत्यांमध्ये त्याचा काही सहभाग असेल तर आपली काही जबाबदारी नसेल असे स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तिने केली आहे.
मनीषा आणि इंतजार यांचा विवाह २०१७ मध्ये झाला होता. सुरुवातीची काही वर्षे सारं सुरळीत सुरू होतं. तसेच त्यांना दोन मुलंही झाली. नंतर इंतजार हा देहराडून येथे कामासाठी गेला. तसेच अडीच वर्षांपासून त्याने घरी येणं जाणं बंद केलं. तो अधूनमधून फोनवर बोलायचा. दरम्यान, त्याची बनावट कागदपत्रं सापडल्यानंतर मनीषा हिला संशय आला. तसेच तिने पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. तसेच यामागे काही कौटुंबिक वाद आहेत का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.