राहुल, नितीश की ममता; INDIA आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? लोकांची 'या' नावाला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 20:14 IST2023-07-23T20:13:07+5:302023-07-23T20:14:15+5:30
विरोधकांच्या INDIA आघाडीचे नेतृत्व कोणी करावे, याबाबत सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर आली.

राहुल, नितीश की ममता; INDIA आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? लोकांची 'या' नावाला पसंती
Survey On Opposition Alliance: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली. केंद्रातील भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी नवीन INDIA आघाडीची स्थापना केली आहे. या अंतर्गत विरोधक NDA चा सामना करणार आहेत. एनडीएकडे आपल्या प्रमुख नेत्याचा चेहरा आहे, पण विरोधकांना आपला प्रमुख चेहरा ठरवता आला नाही.
विरोधकांच्या INDIA आघाडीमध्ये आतापर्यंत 26 विरोधी पक्ष सामील झाले आहेत. काँग्रेसने पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पण, अशा राजकीय वातावरणात जनमत जाणून घेणेही महत्वाचे आहे. सर्वेक्षण करणारी संस्था एबीपी सी-व्होटरने एक सर्वेक्षण केले आहे. यात विरोधी महाआघाडीचा प्रमुख कोण असावा? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आश्चर्यकारक उत्तर मिळाले आहे.
I.N.D.I.A. चे समन्वयक/प्रमुख कोण असावेत, असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात सर्वेक्षणात सहभागी असलेल्या 31 टक्के लोकांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव घेतले. तर 12 टक्के लोकांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची निवड केली. टीएमसीच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाला 8 टक्के लोकांनी पसंती दिली. तर 10 टक्के लोकांनी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव घेतले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी आघाडीचे समन्वयक असावेत, असे 6 टक्के लोकांनी म्हटले आहे. तर 33 टक्के लोकांनी तटस्त राहण्याचा निर्णय घेतला.
राहुल गांधी -31%
नितीश कुमार -12%
ममता बॅनर्जी -8%
अरविंद केजरीवाल -10%
शरद पवार-6%
माहित नाही -33%