Scissors Found From Ashes: डॉक्टरांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची संतापजनक घटना मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात घडली आहे. नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडून मृत्यू झालेल्या एका महिलेच्या चितेतून अस्थी गोळा करताना लोखंडी कात्री सापडल्याने खळबळ उडाली आहे. शस्त्रक्रिया करताना ही कात्री पोटातच विसरल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेवर १२ जानेवारी रोजी स्थानिक शासकीय रुग्णालयात नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रिया पार पडल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून महिलेची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. तिला असह्य वेदना होऊ लागल्याने तातडीने सिहोर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला पुढील उपचारासाठी भोपाळला हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अस्थी गोळा करताना सत्य आले समोर
महिलेच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी जेव्हा कुटुंबातील सदस्य रक्षा विसर्जनासाठी अस्थी आणि राख गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत गेले, तेव्हा त्यांना जळालेल्या अवस्थेत एक धारदार शस्त्रक्रियेची कात्री सापडली. ही कात्री पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान हलगर्जीपणा करून ही कात्री पोटातच सोडली आणि त्यामुळेच जंतू संसर्ग होऊन महिलेचा मृत्यू झाला, असा थेट आरोप आता कुटुंबीयांनी केला आहे.
आरोग्य विभागाची कारवाई आणि डॉक्टरांचे स्पष्टीकरण
हे प्रकरण तापल्यानंतर मध्य प्रदेश आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. ज्या डॉक्टरने ही शस्त्रक्रिया केली होती, त्यांची तातडीने बदली करण्यात आली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दुसरीकडे, भैरूंडा सिव्हिल हॉस्पिटलचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. प्रफुल्ल कुमार यांनी सांगितले की, "साधारणपणे नसबंदीच्या शस्त्रक्रियेत अशा प्रकारच्या कात्रीचा वापर केला जात नाही. महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल."
कुटुंबाची न्यायाची मागणी
महिलेच्या कुटुंबियांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. "एका निष्पाप महिलेचा बळी केवळ डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला आहे, हे या पुराव्यावरून स्पष्ट होते," अशी भावना मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
Web Summary : Scissors found in ashes after a woman's cremation in Madhya Pradesh revealed alleged surgical negligence during a sterilization procedure. The family accuses doctors of leaving scissors inside, leading to infection and death. An investigation is underway.
Web Summary : मध्य प्रदेश में एक महिला के अंतिम संस्कार के बाद अस्थियों में कैंची मिली। परिवार ने नसबंदी सर्जरी के दौरान लापरवाही का आरोप लगाया है, जिससे संक्रमण और मौत हुई। जांच जारी है।