वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:21 IST2025-05-15T12:17:26+5:302025-05-15T12:21:27+5:30
भारताच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हा खटला सादर करण्यात आला. सरन्यायाधीशांनी मंत्र्यांच्या या व्यक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
मध्यप्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचं नाव घेत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यामुळे ते चांगलेच वादात अडकले होते. यानंतर मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई केली होती. मंत्री विजय शाह यांच्या विरोधात एफआयआर देखील नोंदवला गेला होता. मात्र, हायकोर्टाच्या या आदेशानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, देशात वेळ काय आहे आणि तुम्ही काय बोलताय, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिलेली नाही.
भारताच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हा खटला सादर करण्यात आला. सरन्यायाधीशांनी मंत्र्यांच्या या व्यक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सरन्यायाधीशांनी सरळ नकार दिला. "सध्या देश कोणत्या परिस्थितीतून जात आहे, आणि हे असे काय बोलतात. देश अशा काळातून जात असताना उच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा विधानाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही", असे सरन्यायाधीशांनी म्हटले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवला एफआयआर
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री इंदूर जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहितेच्या (BNS) तीन वेगवेगळ्या कलमांखाली मंत्र्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम १५२, १९६(१) (ब) आणि १९७ (१)(क) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
विजय शाहंनी मागितली माफी
मंत्री विजय शाह यांचे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. आता त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. दरम्यान, मंत्र्यांनी एक व्हिडीओ जारी करून सगळ्यांची माफीही मागितली आहे आणि सोफिया कुरेशी यांना आपली बहीण म्हटले आहे. माफी मागताना ते म्हणाले की, "जर मी केलेल्या विधानामुळे कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी सर्वांची माफी मागतो. आपल्या देशाची ती बहीण, सोफिया कुरेशी, जिने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावताना जाती आणि समाजाच्या पलीकडे जाऊन काम केले आहे, तिला मी आपल्या स्वतःच्या बहिणींपेक्षा जास्त आदरणीय मानतो."