भटक्या कुत्र्यांमुळेच नव्हे, तर मोकाट प्राण्यांमुळे होणाऱ्या अपघातांतही मृत्यू; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:43 IST2026-01-08T11:43:32+5:302026-01-08T11:43:47+5:30
राज्यांनी आमच्या आदेशांचे पालन व अंमलबजावणी करावी

भटक्या कुत्र्यांमुळेच नव्हे, तर मोकाट प्राण्यांमुळे होणाऱ्या अपघातांतही मृत्यू; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नागरी संस्थांकडून नियम आणि निर्देशांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आणून देत, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले की, देशात केवळ कुत्र्यांच्या चाव्यांमुळेच नव्हे, तर रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांमुळेही लोकांचा मृत्यू होत आहे.
कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती व न्यायालयाच्या आधीच्या आदेशांची कठोर अंमलबजावणीची मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता व न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर झाली. ७ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशाआधी अनेक वकील व प्राणिप्रेमींचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही, असा दावा झाल्याने ही सुनावणी घेतली जात असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती मेहता यांनी निदर्शनास आणून दिले की, गेल्या २० दिवसांत राजस्थान उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांचे अपघात झाले आहेत आणि त्यांपैकी एक न्यायाधीश अजूनही मणक्याच्या दुखापतींनी त्रस्त आहेत.
‘प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच चांगला असतो’
या प्रकरणात न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वतीने हजर असलेले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, सर्व कुत्र्यांना पकडणे हा उपाय नाही, तर प्राणी-मानव संघर्ष कमी करण्यासाठी जगभरात स्वीकारलेला वैज्ञानिक फॉर्म्युला अवलंबणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, न्यायालय मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी सीएसव्हीआर (पकडा, लसीकरण करा व सोडा) हा फॉर्म्युला स्वीकारू शकते, ज्यामुळे कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना हळूहळू कमी होतील.
एखादा वाघ नरभक्षक असेल, तर आपण सर्व वाघांना मारत नाही, असे सिब्बल म्हणाले. प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच चांगला असतो, असे न्या. नाथ म्हणाले व निदर्शनास आणून दिले की, या प्रकरणात युक्तिवाद करण्यासारखे फारसे काही नाही; कारण, न्यायालयाने संस्थात्मक भागातून मोकाट कुत्र्यांना हटवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही नियमांमध्ये हस्तक्षेप केलेला नाही. खंडपीठ म्हणाले, काही राज्यांनी आमच्या आदेशांची अंमलबजावणी व पालनास प्रतिसाद दिलेला नाही. आम्ही त्या राज्यांशी अत्यंत कठोरपणे वागू.
कुत्र्यांना समुपदेशन देणे एवढेच बाकी
भटक्या प्राण्यांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी रस्ते व द्रुतगती मार्गांना कुंपण घालण्याची सूचना खंडपीठाने केली. खंडपीठाने विनोदाने म्हटले की, आता फक्त कुत्र्यांना समुपदेशन देणे एवढेच बाकी आहे, म्हणजे सोडल्यावर ते चावणार नाहीत.
कुत्र्यांची मन:स्थिती कोण ओळखणार?
कुत्रे व भटक्या प्राण्यांपासून रस्ते मोकळे असले पाहिजेत. केवळ कुत्र्यांच्या चाव्यांमुळेच नव्हे, तर रस्त्यावर भटक्या प्राण्यांची वर्दळ धोकादायक ठरत असून अपघात घडत आहेत.
सकाळी कोणता कुत्रा कोणत्या मन:स्थितीत असेल, हे सांगता येत नाही. नागरी संस्थांनी नियम, मार्गदर्शक तत्त्वे व आदेशांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले.