अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:48 IST2025-10-16T08:46:28+5:302025-10-16T08:48:53+5:30
एका आजारी सुनेचं निधन झाल्यावर तिच्या सासूला हा धक्का सहन झाला नाही. सुनेच्या मृत्यूच्या काही तासांतच सासूनेही अखेरचा श्वास घेतला.

अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
सासू-सुनेचं नातं हे अनेकदा आई-मुलीच्या प्रेमळ नात्यासारखं असतं, पण अनेक ठिकाणी त्यांच्यात मतभेदही पाहायला मिळतात. मात्र, राजस्थानमधील अजमेरमधून एक हृदयद्रावक आणि नात्याची महती सांगणारी घटना समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या एका आजारी सुनेचं निधन झाल्यावर तिच्या सासूला हा धक्का सहन झाला नाही. सुनेच्या मृत्यूच्या काही तासांतच सासूनेही अखेरचा श्वास घेतला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, एकाच घरातून सासू-सुनेच्या एकाच वेळी निघालेल्या अंत्ययात्रेने अनेकांचे डोळे पाणावले.
नेमकं काय घडलं?
ही हृदय हेलावून टाकणारी घटना अजमेर जिल्ह्यातील सरवाड़ कसबा येथील नाथ मोहल्ल्यात घडली. सुनील भटनागर यांच्या कुटुंबावर बुधवारी दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांची पत्नी अनीता गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. भीलवाडा येथील महात्मा गांधी चिकित्सालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सायंकाळी त्यांची तब्येत जास्त बिघडली आणि रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशिरा रुग्णवाहिकेतून अनीता यांचा मृतदेह सरवाड़ येथील घरी आणण्यात आला.
पार्थिवावर डोकं ठेवून सासूनेही सोडले प्राण!
सुनेचा मृतदेह घरी येताच सासू अन्नपूर्णा देवी यांना हा धक्का सहन झाला नाही. त्या तात्काळ सुनेच्या पार्थिवाजवळ गेल्या आणि तिला मिठी मारून मोठ्याने रडू लागल्या. कुटुंबीयांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक त्या बेशुद्ध पडल्या. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सुनेच्या निधनानंतर काही तासांतच सासूनेही जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबावर दुहेरी आघात झाला.
एकाच वेळी निघाली सासू-सुनेची अंत्येष्टी
अखेरीस, एकाच घरातून सासू अन्नपूर्णा देवी आणि सून अनीता यांच्या पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रेम आणि सन्मानावर आधारित या नात्याचा दु:खद शेवट पाहून अनेकांना अश्रू आवरले नाहीत. ही हृदयद्रावक घटना पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली असून, सासू-सुनेचे हे अतूट प्रेम पाहून अनेकांचे डोळे पाणावले.