आसामच्या जंगलात 'सुखोई ३०'चा भीषण अपघात; स्क्वाड्रन लीडर अनुज आणि पुरवेश दुरगकर शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 09:59 IST2026-03-06T09:59:27+5:302026-03-06T09:59:53+5:30
सुखोई-३० एमकेआय फायटर जेटच्या भीषण दुर्घटनेत भारतीय वायुसेनेचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत.

आसामच्या जंगलात 'सुखोई ३०'चा भीषण अपघात; स्क्वाड्रन लीडर अनुज आणि पुरवेश दुरगकर शहीद
आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या सुखोई-३० एमकेआय फायटर जेटच्या भीषण दुर्घटनेत भारतीय वायुसेनेचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत. स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टिनेंट पुरवेश दुरगकर अशी या वीरपुत्रांची नावे आहेत. वायुसेनेने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला असून, दोन्ही शूरवीरांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं काय घडलं?
भारतीय वायुसेनेचे हे फ्रंटलाईन फायटर जेट गुरुवारी नियमित सराव करत असताना अचानक रडारवरून बेपत्ता झाले. आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि डोंगराळ भागावरून उड्डाण करत असताना विमानाचा ग्राउंड कंट्रोलशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने या अपघातात दोन्ही वैमानिकांना वाचवण्यात यश आले नाही.
वायुसेनेकडून श्रद्धांजली
"भारतीय वायुसेना शहीद स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टिनेंट पुरवेश दुरागकर यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत आहे. या कठीण प्रसंगी वायुसेना शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे," असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. ज्या दुर्गम भागात हा अपघात झाला, तिथे पोहोचणे बचाव पथकांसाठी मोठे आव्हान होते.
IAF acknowledges the loss of Sqn Ldr Anuj and Flt Lt Purvesh Duragkar, who sustained fatal injuries in the Su-30 crash. All personnel of the IAF express sincere condolences, and stand firmly with the bereaved family in this time of grief.@DefenceMinIndia@SpokespersonMoD… pic.twitter.com/zUtfUJ2ewr
— Indian Air Force (@IAF_MCC) March 6, 2026
सुखोई आणि अपघातांची मालिका
सुखोई-३० एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या संरक्षणाचे महत्त्वाचे कवच मानले जाते. मात्र, याआधीही आसाममध्ये अशा दुर्घटना घडल्या आहेत.
ऑगस्ट २०१९: तेजपूरजवळ एक सुखोई विमान भातशेतीत कोसळले होते, मात्र तेव्हा दोन्ही पायलट्सनी सुरक्षित झेप घेतली होती.
मे २०१५: तेजपूर एअरबेसवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एक विमान कोसळले होते, त्यामध्येही दोन्ही वैमानिक बचावले होते. मात्र, गुरुवारच्या अपघाताने संपूर्ण देशाला चटका लावला आहे.
तपासाचे आदेश
ज्या भागात रडार संपर्क तुटला, तो भाग अत्यंत घनदाट अरण्याने व्यापलेला आहे. विमानाचे कम्युनिकेशन नक्की कोणत्या कारणाने तुटले आणि हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणाने, याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.