Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:36 IST2025-10-20T16:34:00+5:302025-10-20T16:36:06+5:30
Manu Garg : मनु यांच्या यशात त्यांच्या आईने महत्त्वाची भूमिका बजावली. ही केवळ मनु यांची कामगिरी नाही तर त्यांची आईच त्यांची दृष्टी झाली आणि त्यांनी प्रत्येक पावलावर त्यांना साथ दिली.

Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ती देतात, परंतु फार कमी उमेदवार यशस्वी होतात. जयपूरमधील शास्त्री नगर येथील रहिवासी मनु गर्ग आता अधिकारी आहेत. त्यांनी २०२४ च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया रँक (AIR) ९१ मिळवला. आठवीत असताना त्यांना आपली दृष्टी गमावली.
मनु यांच्या यशात त्यांच्या आईने महत्त्वाची भूमिका बजावली. ही केवळ मनु यांची कामगिरी नाही तर त्यांची आईच त्यांची दृष्टी झाली आणि त्यांनी प्रत्येक पावलावर त्यांना साथ दिली. मनु आठवीत असताना त्यांनी दृष्टी गमावली. त्यांना ब्लॅकबोर्डही दिसत नव्हता. ते अनेक डॉक्टरांकडे गेले, पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांना एका रेयर जेनेटिक डिसऑर्डरचं निदान झालं, ज्यामुळे रेटिनाचं नुकसान होतं.
मनू यांनी जयपूरमधील प्रसिद्ध सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्समध्ये डिग्री मिळवली. ते अभ्यासात उत्कृष्ट होते, अनेकदा ते वर्गात टॉपर असायचे. दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) मधून मास्टर्स केलं.
मनू यांनी देशभरातील १५० हून अधिक वादविवाद स्पर्धा जिंकल्या आहेत. ते त्याच्या महाविद्यालयीन काळात एक स्टार डिबेटर बनले. "वादविवाद हा माझ्यासाठी ओळख निर्माण करण्याचा एक मार्ग होता. त्यामुळे मला अशा जगात आवाज मिळाला जिथे लोक अनेकदा डोळेझाक करतात" असं म्हटलं.
मनू टेक्नॉलॉजीकडे वळले. त्यांनी स्क्रीन रीडर्स, फोन टॉकबॅक टूल्स, ऑडिओ पीडीएफ आणि ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन सॉफ्टवेअरचा वापर केला. या साधनांचा वापर करून मनू यांनी देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. २०२३ मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेला बसले, परंतु त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही घडले नाही.
पहिल्याच प्रयत्नात प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली पण मुख्य परीक्षेत नापास झाले. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पॉलिटिकल सायन्स आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे पर्यायी विषय म्हणून निवडले. या संपूर्ण काळात, त्यांची आई त्यांच्या पाठीशी आधारस्तंभासारखी उभी राहिली, त्यांना पुस्तकं वाचून दाखवली आणि अभ्यास करण्यास खूप मदत केली. दुसऱ्या प्रयत्नात मनू यांनी ९१ वा क्रमांक मिळवून इतिहास रचला.