Rishu Soni : ५० प्रीलिम्स, २७ मेन्स, ६ इंटरव्ह्यूमध्ये अपयश; पालटलं नशीब, आता हातात ६ सरकारी नोकऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:11 IST2026-03-26T14:10:30+5:302026-03-26T14:11:31+5:30
Rishu Soni : सरकारी नोकरीसाठी ५० हून अधिक प्रीलिम्स, २७ मेन्स आणि ६ वेळा मुलाखतीपर्यंत पोहोचून अपयशी झाल्यावर कोणीही खचेल. पण ऋषु यांनी हार मानली नाही.

Rishu Soni : ५० प्रीलिम्स, २७ मेन्स, ६ इंटरव्ह्यूमध्ये अपयश; पालटलं नशीब, आता हातात ६ सरकारी नोकऱ्या
२०१८ मध्ये यूपीच्या एका प्रतिष्ठित कॉलेजमधून पदवी मिळाल्यानंतर, आता सरकारी नोकरी मिळेल असं काही लोकांना वाटतं. पालकांचीही हीच इच्छा असते. पण ऋषु सोनी यांना येणाऱ्या संघर्षाची पुसटशी कल्पनाही नव्हती. 'अपयशाचा मोठा टप्पा' पाहणं अजून बाकी होतं. सरकारी नोकरीसाठी ५० हून अधिक प्रीलिम्स, २७ मेन्स आणि ६ वेळा मुलाखतीपर्यंत पोहोचून अपयशी झाल्यावर कोणीही खचेल. पण ऋषु यांनी हार मानली नाही.
बांदा जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ऋषु यांची स्वप्नं फार मोठी नव्हती. त्यांचे स्वप्न केवळ एक सरकारी नोकरी मिळवण्याचं होतं. पण हे छोटंस स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना एका मोठ्या 'अग्निपरीक्षे'तून जावं लागेल, याची त्यांना कल्पना नसावी. प्राथमिक शिक्षण बांदा जिल्ह्यात झालं. त्यांनी सरस्वती विद्या मंदिर, बांदा येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते घरापासून २०० किमी दूर अलाहाबादला आले. २०१५ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील प्रतिष्ठित अलाहाबाद विद्यापीठात प्रवेश घेतला आणि २०१८ मध्ये पदवी पूर्ण केली.
कॉलेज संपताच ऋषु यांनी सरकारी नोकरीची तयारी सुरू केली. ते सातत्याने अभ्यास करत होते आणि विविध भरती परीक्षांचे फॉर्म भरत होते. २०१८ आणि २०१९ मध्ये त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या, पण सर्व ठिकाणी त्यांना अपयश आलं. इतकेच काय तर त्यांना प्रीलिम्स उत्तीर्ण करता आली नाही. तरीही त्यांचं पाऊल डगमगलं नाही. त्यांनी अपयश विसरून पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं.
ऋषु सांगतात की, सततच्या अपयशानंतर लोक त्यांना सरकारी नोकरीची जिद्द सोडण्याचा सल्ला देऊ लागले होते. अशा वेळी त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेच, शिवाय स्वतःला प्रेरित ठेवून तयारी सुरू ठेवली. अखेर २०२४ मध्ये ऋषु यांनी एक-दोन नव्हे, तर सलग ६ सरकारी भरती परीक्षांमध्ये यश मिळवलं. त्यांनी RRB PO, RRB Clerk, IBPS Clerk, IDBI JAM, IDBI Executive आणि SBI Clerk या परीक्षा उत्तीर्ण केल्या. जरी यावेळी त्यांचे IBPS PO इंटरव्ह्यू आणि SBI PO मेन्स क्लियर झाले नव्हते, तरीही त्यांच्या हातात आता ६ नोकऱ्यांची नियुक्ती पत्रं होती.
'हार न मानण्याची जिद्द' - केवळ याच एका गोष्टीच्या जोरावर ऋषु यांनी ही लढाई जिंकली. ऋषु म्हणतात, "लोक म्हणायचे सोडून दे... पण मन म्हणायचं अजून एकदा प्रयत्न कर. निकालाच्या दिवशी मी पूर्णपणे खचून जायचो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उभा राहायचो. ६.५ वर्षात मी फक्त एकाच गोष्टीचा सराव केला - 'कधीही हार न मानणं'."
ऋषु यांच्या मते, यश एका दिवसात मिळत नाही, पण एक दिवस नक्की मिळते. हे केवळ यश नसून ६.५ वर्षांच्या धैर्याचं फळ आहे. ऋषु सोनी आज उत्तर प्रदेश ग्रामीण बँकेत 'असिस्टंट मॅनेजर' पदावर कार्यरत आहेत. त्यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ही नोकरी स्वीकारली. याआधी त्यांनी IDBI बँकेत तीन महिने हेड कॅशियर म्हणूनही काम केलं आहे.