परिस्थितीची जाणीव! वडील शेतकरी, आई करायची मजुरी; मुलाने IAS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:57 IST2025-02-24T11:57:01+5:302025-02-24T11:57:44+5:30
हेमंतच्या आईला मजुरी म्हणून २०० रुपये मिळायला हवे होते, पण कधी ६० रुपये तर कधी ८० रुपये मिळायचे. एके दिवशी आईने मुलाला आपली व्यथा सांगितली.

परिस्थितीची जाणीव! वडील शेतकरी, आई करायची मजुरी; मुलाने IAS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
राजस्थानमधील एका शेतकऱ्याच्या मुलाने नेत्रदिपक कामगिरी केली आहे, त्याची आई मनरेगामध्ये रोजंदारीवर काम करायची आणि वडील शेतकरी आहेत. घरची परिस्थिती खूप बेताची होती. हेमंतच्या आईला मजुरी म्हणून २०० रुपये मिळायला हवे होते, पण कधी ६० रुपये तर कधी ८० रुपये मिळायचे. एके दिवशी आईने मुलाला आपली व्यथा सांगितली. कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आईला होणाऱ्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी त्याने कलेक्टर होण्याचं मोठं स्वप्न पाहिलं आणि ते त्याने पूर्ण केलं आहे.
हेमंत पारिकचा जन्म राजस्थानमधील विरान तहसील भद्रा जिल्हा हनुमानगड येथील एका गरीब कुटुंबात झाला. त्याची आई मनरेगामध्ये रोजंदारीवर काम करायची आणि वडील शेतकरी होते. महर्षि दयानंद हायस्कूलमधून हिंदी माध्यमातून त्याने दहावीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. हेमंतने सांगितलं की, "एक दिवस मी घरी होतो आणि आईने मला मिठी मारली आणि रडू लागली, मी विचारलं की काय झालं आई, का रडत आहेस? तेव्हा ती म्हणाली बेटा सरकार आम्हाला २२० रुपये देतं आणि इथे आम्ही दिवसभर काम करतो आणि ५०-६० रुपये मिळतात."
"मला याबद्दल खूप वाईट वाटलं आणि मी ऑफिसला पोहोचलो. काही वेळाने तिथल्या व्यवस्थापकाने मला समजावून सांगितलं की, लोकसंख्या जास्त असल्याने हे करावंच लागेल. अशाप्रकारे, जेव्हा मी त्याला एकदा रेकॉर्ड दाखवायला सांगितलं. तर त्यांच्यापैकी एक म्हणाला की, जास्त कलेक्टर बनू नकोस.... त्यावेळी मला कलेक्टर आणि कंडक्टरमध्ये काय फरक असतो हेही माहीत नव्हते. मी निराश होऊन घरी परतलो. त्याच दिवशी मी ठरवलं की एक दिवस मी कलेक्टर होणार. त्या दिवसानंतर मी UPSC-IAS ची तयारी सुरू केली आणि मला वेळोवेळी खूप चांगले मार्गदर्शन मिळत राहिलं. कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात मला शिक्षक आणि इतर मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळाला."
"मी प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालो आणि माझे नाव यादीत होतं. यानंतर मी मुख्य परीक्षेची तयारी केली आणि तीन महिन्यांनी माझा निकाल लागला. त्यानंतर मी पुन्हा मुलाखतीची तयारी सुरू केली. माझी मुलाखत ६ फेब्रुवारी रोजी झाली आणि १६ फेब्रुवारी रोजी अंतिम निकाल जाहीर झाला तेव्हा माझं नाव त्या यादीत ८८४ व्या क्रमांकावर होतं. सततच्या कठोर परिश्रमानंतर, २०२३ च्या यूपीएससीमध्ये दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक ८८४ मिळवला" असं हेमंतने सांगितलं आहे. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहेत.