उमर खालिदसाठी जेएनयू परिसरात केली विद्यार्थ्यांनी निदर्शने, दिल्या वादग्रस्त घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:12 IST2026-01-07T11:12:52+5:302026-01-07T11:12:52+5:30
उमर व शरजीलला जामीन नाकारल्याचे कारण

उमर खालिदसाठी जेएनयू परिसरात केली विद्यार्थ्यांनी निदर्शने, दिल्या वादग्रस्त घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क , नवी दिल्ली : २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या भीषण दंगलीच्या प्रकरणात उमर खालिद व शरजील इमाम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर राजधानीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठापीच्या (जेएनयू) परिसरात विद्यार्थ्यांच्या एका गटाने निदर्शने करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात वादग्रस्त घोषणा दिल्या.
दरम्यान, याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष अदिती मिश्रा यांनी दावा केला की, २०२० मध्ये या परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ दरवर्षी ५ जानेवारीला निदर्शने केली जातात. यावेळी दिलेल्या घोषणा वैचारिक होत्या, यात कुणालाही वैयक्तिक लक्ष्य करण्यात आले नव्हते. दरम्यान, जेएनयूमध्ये दिलेल्या घोषणांबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
घोषणांचाच परिणाम
मंत्री सूद यांच्यानुसार, शरजील याने ईशान्य भारत वेगळा करण्याबद्दल भाष्य केले होते, तर उमर याने ‘भारताचे तुकडे-तुकडे होतील’, अशा घोषणा दिल्या होत्या. या दोघांचाही २०२०च्या दिल्ली दंगलीतील सहभाग स्पष्ट झाला होता.
गुन्हे नोंदवा : जेएनयू
पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या विरोधात वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आवाहन जेएनयू प्रशासनाने पोलिसांना केले आहे. पोलिसांना याबाबत लिहिलेल्या पत्रात जेएनयू प्रशासनाने हे आवाहन केले.
जेएनयू देशात फूट पाडणारे केंद्र, उमटल्या तीव्र प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी जेएनयूमध्ये पंतप्रधान व गृहमंत्र्यांविरुद्ध वादग्रस्त घोषणा दिल्याचा निषेध करून या विद्यापीठाला विरोधकांनी देशात फूट पाडणारे केंद्र केले असल्याचे नमूद केले. दिल्लीचे मंत्री आशीष सूद व मनजिंदरसिंग सिरसा यांनी या घोषणाबाजीचा निषेध केला आहे. सापांचे फणे ठेचले जात असल्याने त्यांचे लाड करणारे कालवा करीत आहेत, ही प्रतिक्रिया दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी दिली.