अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:27 IST2025-11-23T16:27:37+5:302025-11-23T16:27:55+5:30
एका विवाहित महिलेने आपला पती आणि चार मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे...

AI Generated Image
पती-पत्नीच्या नात्यात प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा असतो, पण उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका विवाहित महिलेने आपला पती आणि चार मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, हा निर्णय दोन्ही बाजूंच्या पूर्ण संमतीने आणि लिखित कराराने घेण्यात आला आहे.
हे अजब प्रकरण सिरौली गौसपूर तहसीलच्या बदोसराय कोतवाली क्षेत्रातील सहनीमऊ गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत प्रजापती आणि त्यांची पत्नी सोनी प्रजापती यांच्यात बऱ्याच काळापासून घरगुती वाद सुरू होते. या सततच्या भांडणांना कंटाळून अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या लेखी समझोत्यानुसार, सोनीने आपल्या स्वेच्छेने पती रणजीतला सोडून किंतूर गावातील दीपक यादव याच्यासोबत पती-पत्नीसारखं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
दूध डेअरी ठरली प्रेमाचं केंद्र!
रणजीत प्रजापती यांच्या दूध डेअरीतून ही अजब-गजब लव्हस्टोरी सुरू झाली. रणजीत यांचा गावातच दूध डेअरीचा व्यवसाय आहे. किंतूर गावातील दीपक यादव हा डेअरीवर दररोज दूध विकण्यासाठी यायचा. याच दरम्यान, डेअरी मालक रणजीत यांची पत्नी सोनी आणि दीपक यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांचे प्रेमसंबंध जुळले.
घरातील वाद वाढल्यावर अखेर ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठी पंचायत भरवण्यात आली. पतीने पत्नी सोनीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने गयावया केली, पण पत्नीच्या मनावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. सोनी आपल्या प्रियकरासोबत राहण्याच्या निर्णयावर अडून राहिली. अखेर, हताश झालेल्या पतीने आपल्या स्वेच्छेने लेखी समझोता करून पत्नीला प्रियकराच्या हवाली केले.
चार मुलांची जबाबदारी वडिलांवर!
हा करार करताना, सोनीने आपली चारही मुले पती रणजीत यांच्याकडेच सोडली आहेत. या समझोत्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, यापुढे मुलांची संपूर्ण जबाबदारी वडील म्हणून रणजीत यांचीच असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा करार करताना दोन्ही पक्षांनी या प्रकरणाबाबत कोणतीही कायदेशीर तक्रार किंवा कारवाई करणार नाही, असेही ठरवले आहे.
याबद्दल बदोसराय कोतवालीचे प्रभारी अजीत कुमार विद्यार्थी यांनी माहिती दिली की, या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही आणि पोलिसांच्या उपस्थितीत कोणताही करार झालेला नाही. हा संपूर्ण मामला कुटुंब आणि गाव पातळीवरच मिटवण्यात आला आहे.