सावत्र आईने विषप्रयोग करून केली दोन मुलींची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 17:03 IST2024-08-15T17:03:27+5:302024-08-15T17:03:52+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे सावत्र आई आणि सख्ख्या वडिलांनी मिळून दोन मुलींची विषप्रयोग करून हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

सावत्र आईने विषप्रयोग करून केली दोन मुलींची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण
उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे सावत्र आई आणि सख्ख्या वडिलांनी मिळून दोन मुलींची विषप्रयोग करून हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बिजनौरमधील अकबरपूर तिगरी गावातील आहे. येथील नाजरिन नावाच्या महिलेने पती फरमानच्या मदतीने हादिया आणि आफिया परवीन या दोन मुलींची विषप्रयोग करून हत्या केली. नाजरिन ही मृत मुलीची सावत्र आई होती. या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये खळबळ उडाली. तसेच गावातील शेकडो लोक फरमान याच्या घराबाहेर जमा झाले.
तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचं गांभीर्य पाहून एसपी अभिषेक झा हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत मुलीच्या वडिलांकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. मृत मुलींचा सख्खा बाप असलेल्या फरमान याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या पहिली पत्नी दिलशाना हिला घटस्फोट देऊन नाझरीन हिच्याशी दुसरा विवाह केला होता.
पहिली पत्नी असलेल्या दिलशाना आणि फरमान यांच्या दोन मुली होत्या. मात्र दुसरी पत्नी नाझरिन हिला मात्र या मुली आवडत नव्हत्या. त्यामुळे त्या मुली सावत्र आईकडे न राहता आजोबांसोबत राहायच्या. मात्र काल त्या नाझरिन हिच्याकडे खेळण्यासाठी आल्या होत्या. त्याचदरम्यान, नाझरिन आणि फरमान यांनी मिळून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी मृत मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच नाझरिन आणि फरमाना यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.