विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:54 IST2025-07-30T08:54:01+5:302025-07-30T08:54:37+5:30
Affaire, Forcefully Relationship: २०१९ मध्ये एका आध्यात्मिक आश्रमात त्यांची भेट झाली होती. यावेळी महिलेला ती विवाहित असूनही तो पुरुष आवडला होता.

विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
दिल्लीच्या रोहिणी कोर्टात एक विचित्र प्रकरण आले आहे. या प्रकरणावर कोर्टाने अजब आदेश दिला आहे, जो यापूर्वी कधीही देण्यात आला नसेल. एका विवाहित पुरुषापासून कोणत्याही प्रकारचा संपर्क न करण्यासाठी महिलेला रोखण्यात आले आहे. एवढेच नाही तर त्या विवाहित पुरुषाच्या घरापासून किंवा तो असलेल्या ठिकाणापासून ३०० मीटरच्या परिघातही ती महिला आणि तिचा पती दिसता कामा नये असेही बजावण्यात आले आहे.
प्रकरण खूप नाजूक आहे. ही महिला एका व्यक्तीला तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायची. यामुळे वैतागून या पीडित व्यक्तीने रोहिणी जिल्हा न्यायालयात न्यायाधीश रेणु यांच्या कोर्टासमोर सिव्हिल प्रक्रिया संहिता सीपीसी नुसार तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी करताना २५ जुलैला कोर्टाने हा आदेश जारी केला आहे.
सदर महिला तक्रारदार पुरुषाला त्याच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती. या महिलेला आणि तिच्या पतीला त्याच्या मालमत्तेत प्रवेश करण्यापासून आणि कोणताही अडथळा किंवा त्रास देण्यापासून रोखण्यासाठी अंतरिम मनाई आदेश द्यावा अशी मागणी या पुरुषाने केली होती. २०१९ मध्ये एका आध्यात्मिक आश्रमात त्यांची भेट झाली होती. यावेळी महिलेला तो पुरुष आवडला होता. तिने त्याला प्रेमसंबंधासाठी विचारणा केली होती. त्याने नकार देताच तिने त्याला आत्महत्येची धमकी दिली होती. तो तयार होत नाहीय हे पाहून तिने त्याला भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या त्याला जबरदस्ती करण्यास सुरुवात केली.
ही महिला एवढी वेडी झाली होती की सतत त्याच्या घरी यायला लागली, गोंधळ निर्माण करत राहिली आणि त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत राहिली. संपर्क तोडण्याचा वारंवार प्रयत्न करूनही, महिलेकडून त्याचा छळ सुरुच होता. यामुळे अनेकदा पोलिसांनाही बोलविण्यात आले होते. तरीही या महिलेला तो हवाच होता. तक्रारदाराने चॅट स्क्रीनशॉट आणि सीसीटीव्ही फुटेज इत्यादी न्यायालयासमोर सादर केले. ते पाहून न्यायालयाने पुरुषाच्या इच्छेविरुद्ध संपर्कात राहण्यास भाग पाडता येणार नाही. यामुळे तो मुक्तपणे आयुष्य जगू शकत नाहीय असे म्हणत वरील आदेश दिले आहेत.