६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 05:47 IST2025-08-15T05:47:11+5:302025-08-15T05:47:37+5:30
तब्बल १.७६ लाख कोटी रुपये पाठवले परदेशात

६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली: परदेशात शिक्षण घेण्यासाठी भारतीयांनी गेल्या १० वर्षात तब्बल १.७६ लाख कोटी रुपये परदेशात पाठवल्याची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरटीआयअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानुसार, या प्रचंड रकमेचा वापर देशात नवीन शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी केला असता तर शिक्षणाचे चित्रच बदलले असते.
एका अहवालानुसार, एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) उभारण्यासाठी २०२५मध्ये सुमारे २,८२३ कोटी रुपये खर्च येतो. याचा अर्थ, गेल्या १० वर्षांत परदेशी शिक्षणावर खर्च झालेल्या १.७६ लाख कोटी रुपयांमध्ये भारतात तब्बल ६२ आयआयटी उभ्या राहू शकल्या असत्या.
काय सांगते आकडेवारी?
केवळ २०२३-२४ या वर्षात भारतीयांनी परदेशातील शिक्षणासाठी २९,००० कोटी रुपये पाठवले. यातून १०पेक्षा अधिक आयआयटी उभारता आल्या असत्या.
गेल्या १० वर्षांत परदेशी शिक्षणावर होणारा खर्च १,२०० टक्क्यांनी वाढला आहे. २०१४मध्ये हा आकडा फक्त २,४२९ कोटी रुपये होता, तोच खर्च २०२२-२३ मध्ये २९,१७१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
सरकारचे २०२५-२६ या वर्षासाठीचे परदेशातील उच्च शिक्षणाचे बजेट ५०,०७७.९५ कोटी रुपये आहे. मात्र, भारतीयांनी गेल्या १० वर्षांत परदेशी शिक्षणावर केलेला खर्च या बजेटच्या तिप्पट आहे.
देशातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
हे आकडे देशातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.