Stalin will be the DMK president but there will be challenges | द्रमुकचे अध्यक्ष झाल्यावरही स्टॅलिन यांना आव्हानांचा सामना करावाच लागणार

द्रमुकचे अध्यक्ष झाल्यावरही स्टॅलिन यांना आव्हानांचा सामना करावाच लागणार

चेन्नई- तामिळनाडूमध्ये द्रविड राजकारणातील महत्त्वाचा पक्ष म्हणून काम करणाऱ्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षात 50 वर्षांनी नेतृत्वबदल झाला आहे. सलग पाच दशके पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या करुणानिधी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पूत्र स्टॅलिन यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली आहेत. गेली अनेक वर्षे स्टॅलिन हे जरी करुणानिधी यांचे उत्तराधिकारी मानले जात असले तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. पुढील काळात त्यांना सतत विविध पातळीवरील परिक्षांना सामोरे जावे लागणार आहे. पोटनिवडणुकांमध्ये काय होणार?
तिरुपरनकंद्रुम आणि तिरुवरुर या विधानसभांच्या जागेवर पुढील लोकसभेच्या आधी पोटनिवडणुका होणार आहे. त्या जागा जिंकून स्टॅलिन यांना चांगली कामगिरी करावीच लागेल.

अळगिरी यांच्याकडून सततचे आव्हान
करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांचे पूत्र अळगिरी आणि स्टॅलिन यांच्यामध्ये संघर्ष होईल असे भाकित अनेक तज्ज्ञांनी केले होते. तसे झालेही. आज जरी स्टॅलिन यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली असली तरी त्यांना सतत अळगिरी यांच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. 2014 साली करुणानिधी यांनी अळगिरींना पक्षातून बाहेर काढले होते. अळगिरी यांनी 5 सप्टेंबर रोजी एक रॅली काढण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. त्यांनी जर स्वतःचा पक्ष काढला तर स्टॅलिनविरोधी नेत्यांची त्यांना मदत होऊ शकते. काही नेत्यांनी अळगिरी यांना आपले समर्थन दिले होते.

कमल हसन आणि रजनीकांत फिल्मी जोडी
तामिळनाडूच्याराजकारणात इतकी वर्षे केवळ द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे दोनच महत्त्वाचे पर्याय होते. त्याबरोबर एमडीएमके, पीएमके सारखे लहान पक्ष होते. काँग्रेस आणि भाजपाचेही थोडेच अस्तित्त्व आहे. आता त्यामध्ये कमल हसन आणि रजनीकांत यांनी प्रवेश केला आहे. या दोघांचा स्वतःचा चाहता वर्ग आहे. ते कोणाच्या गटामध्ये जातात त्यावरही मोठा वर्ग मतदान कोणाला करायचे हे ठरवेल.

आता एकदा तरी तुम्हाला ‘अप्पा’ म्हणू का...

करुणानिधी यांचा वारसा कायम ठेवणे
स्टॅलिन यांना करुणानिधी यांच्या राजकारणाचा वारसा चालवणे हे मोठे आव्हान आहे. पेरियार रामास्वामी, अण्णादुराई, कामराज, एम. जी. रामचंद्रन, सी. राजगोपालाचारी अशा दिग्गज नेत्यांमध्ये करुणानिधी यांनी स्वतःचे अस्तित्त्व निर्माण केले होते. त्यामुळे त्यांच्या जागेवर काम करताना स्टॅलिन यांनीही काहीतरी भव्य केले पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तामिळनाडूत सत्ता आणण्याचे त्यांना मोठे काम करावे लागेल.

करुणानिधी : प्रभावी वक्ता, लेखक, कवी, पत्रकार आणि नेताही

2019 या वर्षी होणाऱ्या निवडणूका
2019 साली स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक द्रमुकला लढावी लागणार आहे. 2011 आणि 2016च्या विधानसभा निवडणुकांत द्रमुकचा पराभव झाला होता. तसेच 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्येही द्रमुकचा सपाटून पराभव झाला होता. आता तामिळनाडूमध्ये पक्षाचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी स्टॅलिन यांना प्रयत्न करावेच लागतील. त्यांचे नेतृत्त्व किती काळ टिकेल याची परिक्षाच त्यांना पुढच्यावर्षी द्यायची आहे.

भाजपाचा प्रवेश
तामिळनाडूच्या राजकारणात भाजपाला विशेष पाठिंबा लोकांनी दिलेला नाही. तरीही भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तामिळनाडूमध्ये अधिकाधिक मते मिळवण्याचा निर्धार केला आहे. स्टॅलिन यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या राष्ट्रीय पक्षाशी आघाडी करायची याचा निर्णय घ्यावा लागेल. स्वतंत्र लढायचा निर्णय घेतल्यास तशी तयारी त्यांना करावी लागेल.

...तर स्वतःला जमिनीत पुरुन घेतलं असतं- स्टॅलिन 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Stalin will be the DMK president but there will be challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.