स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:24 IST2025-09-06T15:23:35+5:302025-09-06T15:24:52+5:30
Crime News: खाजगी एअरलाइन्स कंपनीमध्ये वैमानिक असलेल्या एका तरुणाने स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने ७४ हून अधिक तरुणींचे व्हिडीओ चित्रित केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग
खाजगी एअरलाइन्स कंपनीमध्ये वैमानिक असलेल्या एका तरुणाने स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने ७४ हून अधिक तरुणींचे व्हिडीओ चित्रित केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मोहित प्रियदर्शी असं या वैमानिकाचं नाव असून, तो ३१ वर्षांचा आहे. मोहित प्रियदर्शी याने स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने सुमारे ७४ महिलांचे व्हिडीओ चित्रित केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी जेव्हा कोठडीमध्ये याबाबत विचारणा केली असता त्याने असं कृत्य करण्यामागचं धक्कादायक कारण सांगितलं. आरोपी वैमानिकाने हे व्हिडीओ कुठेही अपलोड केले नव्हते, तर त्याने ते आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते.
पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांच्या सुमारासचं आहे. किशनगड गावातील शनीबाजार येथे एक इसम लायटरसारख्या यंत्रामधून आपला व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब एका तरुणीच्या निदर्शनास आली. त्यानंतर तिने याबाबतची तक्रार किशनगड पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली. मग पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी किशनगड पोलिसांनी एक विशेष टीम बनवली. या टीममध्ये एसआय दिव्या यादव, हेड कॉन्स्टेबल योगेश, हेड कॉन्स्टेबल श्याम सुंदर, मोहन आणि विकास यांचा समावेश होता. या टीमचं नेतृत्व किशनगडचे एसएचओ अजय कुमार यादव हे करत होते.
या टीमने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईने पडताळणी केली. तसेच संशयित व्यक्तींचे फोटोही शेअर केले. त्याशिवाय पोलिसांनी स्थानिक खबरी आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवून मोहित प्रियदर्शी या आरोपीला अटक केली. जेव्हा त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. ३१ वर्षीय मोहित प्रियदर्शी हा आग्रा येथील रहिवासी असून, तो एका खासगी एअरलाइन्समध्ये वैमानिक आहे. दरम्यान, हे व्हिडीओ आपण केवळ आपल्या मनाच्या समाधानासाठी काढले होते, असे त्याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितले.