VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 10:16 IST2025-10-24T10:16:14+5:302025-10-24T10:16:53+5:30
एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये मराठी भाषेवरून झालेला वाद सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
एका एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये मराठी भाषेवरून झालेला वाद सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मुंबईला जाणाऱ्या विमानात एका महिला प्रवाशाने यूट्यूबर असलेल्या सहप्रवाशाला 'मुंबईत आला आहात तर, मराठीतच बोलावे लागेल', अशी सक्ती करत धमकी दिल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमके काय घडले?
'माहीनेर्जी' नावाचे यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या माही खान नावाच्या यूट्यूबरने ही घटना आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. ही घटना कोलकाताहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक 'AI676'मध्ये घडली.
व्हिडीओमध्ये महिला प्रवासी यूट्यूबरला स्पष्टपणे म्हणताना दिसत आहे की, "जर तुम्हाला मुंबईत राहायचे असेल तर मराठीत बोलावे लागेल." यूट्यूबरने जेव्हा आपण मराठी बोलू शकत नाही असे सांगितले, तेव्हा महिलेने धमकीच्या सुरात म्हटले, "मुंबईला उतर मग दाखवते उद्धटपणा काय असतो."
युट्यूबरने व्यक्त केला संताप
माही खानने पोस्टमध्ये म्हटले की, "आज एअर इंडियाच्या फ्लाईट 'एआय६७६'मध्ये एका महिलेने माझ्याशी असा वाद घातला आणि मराठी येत नाही म्हणून धमकी दिली. २०२५मध्ये 'विविधतेत एकता' म्हणणाऱ्या देशात असे घडते. ही महिला '१६ ए' सीटवर बसली होती आणि मुंबईला जात असल्यामुळे मला मराठीतच बोलावे लागेल म्हणून ओरडत होती. जेव्हा मी शांतपणे 'हा काय उर्मटपणा आहे?' असे विचारले, तेव्हा ती म्हणाली, 'मी तुला दाखवते हा काय उर्मटपणा आहे ते.."
खानने सांगितले की त्याने हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला, कारण हा केवळ त्याच्यापुरता मर्यादित नसून, ही वाढत चाललेली 'धोकादायक मानसिकता' आहे. "तुम्ही कोणावर कोणतीही भाषा सक्तीने लादू शकत नाही. तुम्ही आदरासाठी धमकी देऊ शकत नाही," असे त्याने स्पष्टपणे म्हटले आहे.
सोशल मीडियावर संताप; कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितले
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी युट्यूबरच्या म्हणण्याला पाठिंबा दिला आहे, तर काही लोकांनी 'पूर्ण व्हिडीओ पाहिल्याशिवाय काही बोलणे योग्य नाही', असे मत व्यक्त केले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यूट्यूबरने एअर इंडियाला टॅग करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "प्रिय एअर इंडिया, कृपया अशा लोकांवर कठोर कारवाई करा, त्यांच्यावर बंदी घाला. कोणत्याही प्रवाशाला केवळ दुसरी भाषा बोलल्यामुळे असुरक्षित किंवा अपमानित वाटू नये," असे त्याने लिहिले.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेने 'ह्युंडई' कंपनीचा शर्ट परिधान केल्यामुळे अनेक लोक थेट कंपनीलाही यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी करत आहेत. मात्र, अनेकांनी 'यात एअर इंडिया आणि ह्युंडईचा काय दोष?' असा प्रतिप्रश्नही केला आहे. या प्रकरणावर अद्याप एअर इंडिया किंवा ह्युंडईने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.