भाजपाच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय, सोनिया गांधींनी व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 12:55 PM2018-12-12T12:55:14+5:302018-12-12T13:17:47+5:30

भारतीय जनता पार्टीचा तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवावर सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

sonia gandhi reaction assembly election result bjp rahul gandhi | भाजपाच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय, सोनिया गांधींनी व्यक्त केला आनंद

भाजपाच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय, सोनिया गांधींनी व्यक्त केला आनंद

Next

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीचा तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवावर सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे मंगळवारी निकाल जाहीर झाले.

यावेळी छत्तीसगड, राजस्थान मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. विजयासाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली.  मध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला आहे. पाचपैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही तीन राज्य भाजपाकडे होती.



दरम्यान, प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे सोनिया गांधींनी निवडणुकांचा प्रचारांमध्ये सहभाग घेतला नाही. मंगळवारी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. छत्तीसगडमध्ये 90 जागांपैकी काँग्रेसला 67 जागा मिळाल्या, मध्य प्रदेशात 230 जागांपैकी 114 जागा आणि राजस्थानमध्ये 199 जागांपैकी 99 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला. छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडे बहुमत आहे. मात्र, मध्य प्रदेशात केवळ दोन जागांमुळे काँग्रेस बहुमतापासून दूर होती. दरम्यान, आता सपा-बसपा आणि अपक्षांनी कमलनाथ यांना पाठिंबा दर्शवण्याचे जाहीर केले आहे. राजस्थानमध्येही बसपा-सपानं काँग्रेस समर्थन दर्शवले आहे. 



(मोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षांत अनेक चांगली कामे करून दाखविण्याची संधी असताना त्यांनी ती घालवली. लोकांच्या मनात काय चालले आहे, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. शिवाय सरकार, मंत्री व पक्ष अतिशय अहंकाराने वागू लागले. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांत भाजपाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हणाले.

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ते म्हणाले की, देशापुढे रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार निर्मूलन हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते मोदी यांनी मांडले होते, पण त्या प्रश्नावर प्रत्यक्षात काहीच केले नाही. त्यामुळे हेच मुद्दे घेऊन आम्ही पुढील काळात काम करणार आहोत. मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जनतेला फक्त स्वप्ने दाखविली. ती पूर्ण न केल्याने जनतेने भाजपाला पराभूत केले.

मला २०१४च्या लोकसभा निवडणुकांतून खूप शिकायला मिळाले. येत्या लोकसभा निवडणुकांत विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपाविरोधात मजबूत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सपा, बसपा व काँग्रेसची विचारसरणी समानच आहे. अन्य विरोधकांनीही या आघाडीत सामील व्हावे, असा प्रयत्न आहे. तो यशस्वी झाल्यास भाजपाचा पराभव आम्ही नक्की करू शकतो. काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे आमच्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे. त्या दृष्टीने आम्ही देशापुढे एक नवा कार्यक्रम ठेवणार आहोत, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले.



 


 

Web Title: sonia gandhi reaction assembly election result bjp rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.