'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:39 IST2025-09-27T16:35:14+5:302025-09-27T16:39:15+5:30
सोनम वांगचुक पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचा खुलासा पोलिसांनी केला.

'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
Leh Ladakh Violence: लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी लेहमध्ये हिंसक आंदोलन झालं ज्यात चौघांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले. लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले. त्यानंतर पोलिसांनी वांगचूक यांना हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली. त्यानंतर आता लडाखचे डीजीपी एसडी सिंग जामवाल यांनी सोनम वांगचुक यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप केला आहे आणि त्यांच्या बांगलादेशच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखची राजधानी लेहमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे लडाखपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे. हिंसक आंदोलनाच्या दोन दिवसांनंतर शुक्रवारी पोलिसांनी सोनम वांगचुक यांना अटक करुन जोधपूर तुरुंगात आणलं. आता लडाख पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्याबाबत नवीन खुलासा केला आहे.
"आम्ही अलीकडेच एका पाकिस्तानी व्यक्तीला अटक केली आहे जो सोनम वांगचुकच्या संपर्कात होता आणि त्याला रिपोर्ट करत होता. आमच्याकडे याचे रेकॉर्ड आहेत. वांगचूक पाकिस्तानमध्ये डॉनच्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्याने बांगलादेशलाही भेट दिली होती. त्यामुळे, त्याच्याबाबत एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याची चौकशी सुरू आहे," असं लडाखचे डीजीपी डॉ. एस.डी. सिंग जामवाल म्हणाले.
#WATCH | Leh: Speaking on the 24th Sept violence, Ladakh DGP Dr. S.D Singh Jamwal says, "...We also arrested a Pakistan PIO in the recent past who was in touch with him (Sonam Wangchuk) and reporting back across. We have a record of this. He had attended a Dawn event in Pakistan.… pic.twitter.com/q4YnhyrQlE
— ANI (@ANI) September 27, 2025
लेह हिंसाचारात कोणत्याही देशविरोधी घटकांचा सहभाग आहे का असे विचारले असता एस.डी .सिंग जामवाल म्हणाले की, "हा तपासाचा विषय आहे. पण जखमींना रुग्णालयात नेण्याच्या पहिल्याच दिवशी, गोळीबारात जखमी झालेल्या २-३ नेपाळी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या माहितीनंतर, असे आणखी २-३ प्रकार समोर आले आहेत. तीन नेपाळी नागरिकांची ओळख पटली आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."
"आम्ही दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने कर्फ्यू शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या शहरात ही सूट दिली जाईल. नवीन भागात, आम्ही दुपारी ३:३० ते ५:३० पर्यंत सूट देऊ," असेही एसडी सिंह जामवाल म्हणाले.