Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:57 IST2025-09-26T15:56:40+5:302025-09-26T15:57:15+5:30
Sonam Wangchuk Arrested: पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात हिंसाचार झाला. या प्रकरणात पोलिसांनी सोनम वांगचूक यांना अटक केली आहे.

Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
Sonam Wangchuk Latest News: लेह लडाखमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात ४ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ७० लोक जखमी झाले होते. हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी दगडफेक, जाळपोळ केली. भाजपच्या कार्यालयालाही आग लावली होती.
लडाख केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू केले होते. १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाला २४ सप्टेंबर रोजी हिंसक वळण लागले.
लेहमध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती असून, सोनम वांगचुक यांनी चिथावणी दिल्यामुळेच ही हिंसा भडकल्याचे केंद्राने म्हटले होते. या प्रकरणात आता लेह पोलिसांनी सोनम वांगचूक यांना अटक केली आहे.
सरकारने वांगचूक यांच्या स्वयंसेवी संस्थेची एफसीआरए नोंदणी रद्द करण्याचाही निर्णय घेतला आहे. वांगचूक यांच्या संस्थेला परदेशातून येणाऱ्या निधीमध्ये कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. स्टुडण्ट एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख ही वांगचूक यांची स्वंयसेवी संस्था आहे.
माझ्यावर बिनबुडाचे आरोप -वांगचूक
वांगचूक यांनी केलेल्या भाषणामुळेच लेह, लडाखमध्ये हिंसाचार उफाळून आला असे केंद्र सरकारने म्हटले असले, तरी सोनम वांगचूक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ही वेळ आरोप-प्रत्यारोप करण्याची नाही, तर बसून समस्या सोडवण्याची आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत, असे वांगचूक म्हणाले.