"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 18:06 IST2025-10-05T18:06:33+5:302025-10-05T18:06:55+5:30
सोनम वांगचुक यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत तुरुंगात राहण्यास तयार असल्याचे म्हटलं आहे.

"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
Sonam Wangchuk: पर्यावरण कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांनी लेहमधील हिंसाचाराची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. या हिंसाचारामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला होता. २४ सप्टेंबर रोजी राज्याचा दर्जा पुनर्संचयित करणे आणि सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी करणे या मागणीसाठी झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचार उसळला होता. त्यानंतर वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले. आता तुरुंगातून पाठवलेल्या मेसेजमध्ये त्यांनी लडाखवासीयांना शांतता आणि एकता राखण्याचे आणि अहिंसक, गांधीवादी पद्धतीने लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. सोनम वांगचुक यांचा मेसेज त्यांचा भाऊ त्सेतान दोर्जे ले आणि वकील मुस्तफा हाजी यांच्यामार्फत देण्यात आला, ज्यांनी शनिवारी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात त्यांची भेट घेतली.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत जोधपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तुरुंगातून हा जारी केला आहे. लेहमधील हिंसाचाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते तुरुंगात राहण्यास तयार असल्याचे वांगचूक यांनी सांगितले. तसेच मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असल्याचेही सोनम वांगचूक म्हणाले. त्यांनी लोकांनी शांततेत निदर्शने सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. ३ सप्टेंबर रोजी सोनम वांगचुक यांचे मोठे भाऊ त्सेतान दोर्जे ले आणि वकील मुस्तफा हाजी यांनी जोधपूरमध्ये त्यांची भेट घेतली.
"मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आहे. माझ्यासाठी काळजी आणि प्रार्थना व्यक्त करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी किंवा अटक झालेल्यांसाठीही मी प्रार्थना करतो. आमच्यातील चार जणांच्या हत्येची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. ते होईपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे," असं सोनम वांगचूक यांनी म्हटलं.
वांगचुक यांनी लेह एपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) च्या लडाखला सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे आणि पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा या मागण्या पुन्हा मांडल्या. त्यांनी लडाखमधील लोकांना शांतता आणि एकतेने त्यांचे आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. तुरुंगात गेल्यापासून सोनम वांगचुक यांचा हा पहिलाच मेसेज आहे. वांगचूक यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप आहे. लडाख पोलिसांनी वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला आहे. गृहमंत्रालयाने त्याच्या एनजीओचा एफसीआरए परवाना रद्द केला आहे. त्याच्याविरुद्ध सीबीआय चौकशी देखील सुरू आहे.