मुलगा एसपी; वडील त्याच्याच कार्यालयात कॉन्स्टेबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:42 IST2018-10-30T04:07:20+5:302018-10-30T06:42:17+5:30
आयुष्यभर इमानइतबारे नोकरी करणाऱ्या जनार्दन यांचा मुलगा त्यांच्याच गावात आणि त्यांच्याच कार्यालयात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाला तेव्हा जनार्दन सिंह यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

मुलगा एसपी; वडील त्याच्याच कार्यालयात कॉन्स्टेबल
लखनौ : मुलाने आपल्यापेक्षा खूप मोठे व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मुलगा मोठा अधिकारी झाला तर आई-वडिलांना गगन ठेंगणे होते. लखनौतील पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन सिंह यांच्या बाबतीत असेच झाले. आयुष्यभर इमानइतबारे नोकरी करणाऱ्या जनार्दन यांचा मुलगा त्यांच्याच गावात आणि त्यांच्याच कार्यालयात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाला तेव्हा जनार्दन सिंह यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पोलीस अधीक्षक मुलाच्या नेतृत्वात हा कॉन्स्टेबल पिता आता काम करणार आहे आणि आनंदाच्या डोही आनंद तरंंग असा अनुभवही घेणार आहे.
जनार्दन सिंह यांच्या या मुलाचे नाव आहे अनुपकुमार सिंह. २०१४ मध्ये आयपीएस परीक्षा आणि त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुपकुमार हे उन्नावमध्ये रुजू झाले होते. आता त्यांची बदली लखनौमध्ये झाली आहे. त्यांच्याकडे लखनौ उत्तरचा पदभार सोपविण्यात आला. (वृत्तसंस्था)
त्यांच्या तत्त्वाने जगण्याचा प्रयत्न
आकाशाला गवसणी घालणाऱ्या पोलीस अधीक्षक मुलाचे पाय मात्र आजही जमिनीवर आहेत. अनूप म्हणतात की, आजही वडिलांच्या पाया पडून माझ्या दिवसाची सुरुवात होते. त्यांच्या तत्त्वाप्रमाणे जगण्याचा मी प्रयत्न करीत आहे. ते मला व बहिणीला सायकलवर शाळेत सोडत होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही खूप मेहनतीने त्यांनी आम्हाला शिकविले आहे.