भारत-सिंगापूर व्यापारी संबंधांत काही राज्यांचीही असेल महत्त्वाची भागीदारी - पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 05:06 IST2025-09-05T05:05:36+5:302025-09-05T05:06:43+5:30
वार्षिक ४८ लाख कंटेनर हाताळणी क्षमतेच्या भारत-मुंबई कंटेनर टर्मिनलचा शुभारंभ

भारत-सिंगापूर व्यापारी संबंधांत काही राज्यांचीही असेल महत्त्वाची भागीदारी - पंतप्रधान मोदी
उरण - भारत-सिंगापूर व्यापारी संबंधांमध्ये देशातील काही राज्येही महत्त्वपूर्ण भागीदार असतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केला. ‘पीपीपी’च्या माध्यमातून जेएनपीएने ११,४०० कोटी खर्च करून बंदरातील सर्वाधिक लांबीच्या आणि वार्षिक ४८ लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेल्या भारत-मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी-सिंगापूर पोर्ट) बंदराचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
गेल्यावर्षी सिंगापूर दौऱ्यात दोन्ही देशांच्या संबंधांना व्यापक सामरिक भागीदारीचा दर्जा दिला होता. या वर्षभरात परस्पर संवाद आणि सहकार्य गतिशील आणि दृढ झाले आहे. आमचे सहकार्य केवळ पारंपरिक क्षेत्रापुरते मर्यादित राहणार नाही. बदलत्या काळानुसार प्रगत उत्पादन, हरित नौवहन, कौशल्यवर्धन, नागरी आण्विक आणि नागरी जलव्यवस्थापन ही क्षेत्रेही आमच्या सहकार्याचे केंद्रबिंदू ठरतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
समुद्री क्षेत्रात महाराष्ट्र महासत्ता बनेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनेल, असा विश्वास व्यक्त केला. या ऐतिहासिक घटनेमुळे भारतातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून, हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे, असे त्यांनी सांगितले.
🇮🇳-🇸🇬| Strengthening maritime infrastructure & regional connectivity.
— Randhir Jaiswal (@MEAIndia) September 4, 2025
PM @narendramodi and PM @LawrenceWongST jointly inaugurated Phase-2 development of the Bharat Mumbai Container Terminal (BMCT), developed in partnership with Singapore, at Navi Mumbai’s Jawaharlal Nehru Port… pic.twitter.com/OMych2FnoL
पाठिंब्याबद्दल मानले आभार
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांप्रति संवेदना, दहशतवाद विरुद्धच्या आमच्या लढाईला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान वॉन्ग आणि सिंगापूर सरकारचे आभारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.