१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:58 IST2026-01-07T08:56:42+5:302026-01-07T08:58:10+5:30
मानवी तस्करी करणाऱ्या टोळीने पळवून नेलेला जरीना खातून यांचा मुलगा मुन्ना तब्बल १३ वर्षांनंतर सुखरूप घरी परतला आहे.

१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
एका आईची जिद्द आणि आपल्या काळजाच्या तुकड्याला पुन्हा पाहण्याची ओढ काय करू शकते, याचे जिवंत उदाहरण बिहारच्या अररिया जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. मानवी तस्करी करणाऱ्या टोळीने पळवून नेलेला ५५ वर्षीय जरीना खातून यांचा मुलगा मुन्ना तब्बल १३ वर्षांनंतर सुखरूप घरी परतला आहे. अंदमान ते म्यानमारपर्यंतच्या नरकयातना सोसून जेव्हा २५ वर्षांचा मुन्ना आपल्या आईसमोर उभा राहिला, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.
मदरशाच्या बहाण्याने घातला डल्ला
ही काळजाचा थरकाप उडवणारी गोष्ट २०१२ मध्ये सुरू झाली. जरीना खातून यांचा मुलगा जमशेद ऊर्फ मुन्ना हा तेव्हा अवघ्या १२ वर्षांचा होता. घरातील परिस्थिती हलाखीची होती, पती आजारी होते. याच संधीचा फायदा घेत गावातीलच काही नराधमांनी मुन्नाला उत्तर प्रदेशातील भदोही येथील एका मदरशात शिक्षणासाठी नेतो, असे आमिष दाखवले. मात्र, मदरसा तर दूरच, या नराधमांनी मुन्नाला चक्क १५ लाख रुपयांना विकून टाकले.
अंदमान, म्यानमार आणि अतोनात छळ
मुन्नाने आपल्यावर ओढवलेल्या संकटाचा पाढा वाचताना सांगितले की, त्याला आधी भदोही, नंतर अंदमान आणि तिथून थेट म्यानमारला नेण्यात आले. तिथे त्याला गुलामासारखे वागवले जात होते. "माझ्याकडून दिवस-रात्र जबरदस्तीने काम करून घेतले जायचे. कधी वेळेवर जेवण मिळायचे नाही, तर कधी शरीरात इंजेक्शन टोचले जायचे. थोडा जरी आराम केला तरी बेदम मारहाण व्हायची. एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी माझे हाल हाल केले," असे सांगताना मुन्नाला हुंदके आवरत नव्हते.
आईचा १३ वर्षांचा एकाकी लढा
मुलाला पळवून नेल्याचे लक्षात येताच जरीना यांनी मोहम्मद जावेद, मुर्शीद आणि दुखखान यांच्याविरुद्ध तक्रार केली. मात्र, या तक्रारीची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. आरोपींनी त्यांना गावातून हाकलून दिले, त्यांचे घर पाडले. अनेक वर्षे त्यांना रस्त्याच्या कडेला राहून दिवस काढावे लागले. पण, जरीना यांनी हार मानली नाही. त्यांनी न्यायालयात लढा सुरूच ठेवला. अखेर ३ महिन्यांपूर्वी न्यायालयाने मुख्य आरोपीचा जामीन फेटाळला आणि मुन्नाला परत आणण्याचे आदेश दिले.
असा झाला पुनर्जन्म
पोलीस आणि बालकल्याण समितीच्या मदतीने मुन्नाची सुटका करण्यात आली. म्यानमारमधून त्याला नागालँडमध्ये सोडण्यात आले, तिथून ट्रकमधून प्रवास करत तो अररिया रेल्वे स्थानकावर पोहोचला. १३ वर्षांपूर्वीचा १२ वर्षांचा छोटा मुन्ना आता २५ वर्षांचा तरुण होऊन परतला आहे. अररियाचे एसडीपीओ सुशील कुमार यांनी सांगितले की, "मुन्नाला न्यायालयात हजर केले जाईल आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या मानवी तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला जाईल."