…म्हणून मुलांनीच वयोवृद्ध वडिलांची केली तुरुंगात रवानगी, असा रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 19:53 IST2025-03-13T19:53:05+5:302025-03-13T19:53:27+5:30
Uttar Pradesh Crime News: आजच्या काळात पैशांची हाव वाढली की माणसं नातेसंबंधांनाही विसरून जातात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे राहणाऱ्या १०३ वर्षांच्या गुरदीप सिंग या वयोवृद्ध शेतकऱ्याची त्यांच्याच मुलांनी तुरुंगात रवानगी केली.

…म्हणून मुलांनीच वयोवृद्ध वडिलांची केली तुरुंगात रवानगी, असा रचला कट
आजच्या काळात पैशांची हाव वाढली की माणसं नातेसंबंधांनाही विसरून जातात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे राहणाऱ्या १०३ वर्षांच्या गुरदीप सिंग या वयोवृद्ध शेतकऱ्याची त्यांच्याच मुलांनी तुरुंगात रवानगी केली. आपले वडील त्यांची ५ एकर जमीन गुरुद्वाराला दान करतील या भीतीने त्यांच्या दोन मुलांनी त्यांना कटकारस्थान रचून तब्बल १९ महिने तुरुंगात ठेवले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार २०१८ मध्ये गुरदीप सिंग यांचं कुटुंब एका कौटुंबिक वादात फसलं होतं. तसेच हत्येच्या प्रयत्नाच्या एका प्रकरणात गुरदीप आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक झाली होती. मात्र त्यांना जामीन मिळाला होता. तसेच कोर्टामध्ये खटला सुरू होता. दरम्यान, गुरदीप सिंग यांचे दोन मुलगे कमलजीत आमि हरप्रीत यांनी एक कट रचला. त्यांनी गुरदीप यांना हा खटला निकालात निघाला असून, कोर्टात जाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. तर हे दोघेही मात्र गुपचून सुनावणीदिवशी हजर राहू लागले.
अनेक तारखांना अनुपस्थित राहिल्यानंतर गुरदीप सिंग यांच्याविरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं. तसेच ऑगस्ट २०२२ मध्ये अटक करून तुरुंगात पाठवलं. तिथे गुरदीप सिंग यांनी त्यांची व्यथा तुरुंग अधीक्षकांना सांगितली. मला कोणी भेटायला येत नाही. तसेच थंडीपासून बचावासाठी माझ्याकडे कपडे आणि पगडीही नाही, असे सांगितले. त्यानंतर तुरुंग अधीक्षकांनी एका एनजीओकडे मदत मागितली.
या एनजीओने गुरदीप सिंग यांना आवश्यक वस्तू पुरवल्या. सोबतच त्यांच्या जामिनाची व्यवस्था केली. हे वृत्त ऐकून त्यांचे दोन्ही मुलगे घाबरले. त्यांनी जामिनाला विरोध केला. तसेच स्वत: जामीन राहण्यास तयार असल्याचे सांगितले, मात्र त्यांनी वडिलांना जामीन मात्र दिला नाही. अखेरीस तीन महिन्यांनंतर कोर्टाने हस्तक्षेप करून गुरदीप सिंग यांना मुक्त केलं. आता ते एका एका एनजीओच्या देखरेखीखाली आहेत.