...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 19:48 IST2025-05-11T19:48:10+5:302025-05-11T19:48:51+5:30
ही क्षेपणास्त्रे जमीन, समुद्र आणि हवा या तिन्ही आघाड्यांवरून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.

...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार!
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते रविवारी ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचे उद्घाटन करण्यात आले. जो उत्तर प्रदेशच्या डिफेंस इंडस्ट्रियल कॉरिडोरचा एक भाग आहे. सिंह यांनी व्हर्चुअल पद्धतीने हे उद्घाटन केले. नुकतेच याच ब्रह्मोसच्या सहाय्याने भारतानेपाकिस्तानातील अनेक हवाई तळांना लक्ष्य करून ती नष्ट केली आणि जगाला भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवले.
आता, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विद्यमान व्हर्जनसह पुढील पिढीतील हलक्या वजनाच्या ब्रह्मोस-एनजी क्षेपणास्त्रांची निर्मिती देखील लखनौमधील याच अत्याधुनिक युनिटमध्ये केली जाईल. ही क्षेपणास्त्रे जमीन, समुद्र आणि हवा या तिन्ही आघाड्यांवरून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.
हे युनिट दरवर्षी ८० ते १०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि भविष्यात १०० ते १५० एनजी व्हर्जन तयार करेल. डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओ माशिनोस्ट्रोयेनिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्राह्मोस एरोस्पेसने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राचा वेग सुमारे ३,४३० किमी प्रतितास एवढा असून मारा क्षमता ४०० किमीपर्यंत आहे.
कुठे कुठे डागले गेले ब्रह्मोस? -
पाकिस्तानने सिरसा येथे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्यानंतर भारताने १० प्रमुख हवाई तळांवर मिसाईल हल्ला चढवत प्रत्युत्तर दिले. यात नूर खान, रफीकी, सरगोधा, मुरीद, सुक्कूर, स्कर्दू, सियालकोट, पसरूर, जेकोबाबाद आणि भोलारी या महत्त्वाच्या तळांचा समावेश होता. या तळांवर ब्राह्मोस, हॅमर आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. नूर खान तळावरील हल्ला हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. कारण ते पाकिस्तानच्या हवाई रसद आणि आण्विक योजनांशी जोडलेले केंद्र होते.