विमानाच्या केबिनमधून धूर निघाल्याने खळबळ, ३६ हजार फुटांवर थरार! एअर इंडिया विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:21 IST2026-03-31T11:20:53+5:302026-03-31T11:21:38+5:30
बागडोगरा-दिल्ली एअर इंडिया विमानाला लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ३६ हजार फूट उंचीवर धूर दिसल्याने ऑक्सिजन मास्क पडले आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

विमानाच्या केबिनमधून धूर निघाल्याने खळबळ, ३६ हजार फुटांवर थरार! एअर इंडिया विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
बागडोगरा येथून दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्याविमानाला सोमवारी संध्याकाळी भीषण तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. विमानाच्या केबिनमधून अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत लखनौ विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग केल्याने मोठा अनर्थ टळला. विमानात १४८ प्रवाशांसह क्रू मेंबर्स होते, जे सर्वजण सुखरूप आहेत.
३६ हजार फुटांवर दिसला धूर
एअर इंडियाचे 'IX 1523' हे विमान बागडोगरा येथून दिल्लीसाठी झेपावले होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास हे विमान उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यावर ३६ हजार फूट उंचीवर असताना, वैमानिकाला केबिनमधील एव्हिओनिक पॅनलमधून धूर निघताना दिसला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तातडीने लखनौ एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली आणि 'मे-डे' कॉल देऊन आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना मिळताच आपत्कालीन यंत्रणा सक्रिय झाली आणि प्रवाशांच्या आसनांवरील ऑक्सिजन मास्क आपोआप खाली पडले. यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. लखनौ विमानतळावर लँडिंगच्या वेळी अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर वैद्यकीय सेवा धावपट्टीवर सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. सुदैवाने, ५ वाजून १७ मिनिटांनी विमानाचे यशस्वी लँडिंग झाले.
प्रवाशांची पर्यायी व्यवस्था
विमान जमिनीवर उतरल्यानंतर तांत्रिक पथकाने विमानाची तपासणी सुरू केली आहे. विमानातील काही प्रवाशांना रात्री उशिरा दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले, तर काही प्रवाशांच्या राहण्याची सोय हॉटेलमध्ये करण्यात आली. एअर इंडियाचे तांत्रिक पथक आता हा धूर नक्की कशामुळे निघाला, याचा सखोल तपास करत आहे.