जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:20 IST2025-07-15T15:20:01+5:302025-07-15T15:20:25+5:30
Hyderabad Men Death Mystery: हैदराबादमधील नामापल्ली परिसरामध्ये एका जुन्या बंद असलेल्या घरात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, मृतदेहाजवळ सापडलेल्या एका जुन्या मोबाईल फोनमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
हैदराबादमधील नामापल्ली परिसरामध्ये एका जुन्या बंद असलेल्या घरात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली होती. क्रिकेट खेळताना हरवेला चेंडू शोधण्यासाठी एक तरुण या घराजवळ गेला असताना या घटनेचा उलगडा झाला होता. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. आता पोलिसांनी केलेल्या तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा सांगाडा अमीर खान नावाच्या व्यक्तीचा असून, ते गेल्या १० वर्षांपासून बेपत्ता होते. सांगाड्याजवळ सापडलेल्या एका जुन्या नोकियाच्या फोनमुळे या व्यक्तीची ओळख पटवण्यात आणि या प्रकरणाचं गुढ उकलण्यात पोलिसांना मोठी मदत झाली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हैदराबादमधील नामपल्ली बाजार परिसरामध्ये असलेल्या एका जुनाट घरामध्ये हा मानवी सांगाडा सापडला होता. हे घर मागच्या सात वर्षांपासून बंद होतं. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला असता त्यांना तिथे सांगाड्याजवळ एक जुना नोकियाचा फोन सापडला. सुरुवातीला हा हत्येचा प्रकार असू शकतो, असा संशय पोलिसांना आला. मात्र फोनची पडताळणी केली असता या मृतदेहाबाबत सर्व माहिती समोर आली. हा फोन चार्ज करून सुरू केला असता त्यामध्ये ८४ मिस कॉल आलेले दिसले. हे मृत अमीर खान याचे नातेवाईक आणि मित्रांचे होते. हे फोन २०१५ साली केलेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अमीर खान हा मुनीर खान यांच्या एकूण १० मुलांपैकी तिसरा मुला होता. तो या घरात एकटा राहायचा. कुटुंबातील इतर सदस्य अन्यत्र निघून गेले होते. २०१५ मध्ये अमीर खान याचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला होता. कदाचित एकटेपणा किंवा इतर कारणामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, अमीर खान याच्या सांगाड्या शेजारी सापडलेला मोबाईल आणि नोटाबंदीपूर्वीच्या जुन्या नोटा यामुळे त्याचा मृत्यू २०१५ पूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.