वडिलांचं निवृत्तीवेतन आणि मालमत्तेवरील ताब्यासाठी बहिणीने केली दोन भावांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:34 IST2024-12-16T18:34:20+5:302024-12-16T18:34:46+5:30
Andhra Pradesh Crime News: आंध्र प्रदेशमधील पालनाडू जिल्ह्यामधील संपत्तीच्या लालसेतून हत्येची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने वडिलांचं निवृत्तीवेतन आणि मालमत्तेवरील कब्ज्यासाठी आपल्याच दोन भावांची हत्या केली.

वडिलांचं निवृत्तीवेतन आणि मालमत्तेवरील ताब्यासाठी बहिणीने केली दोन भावांची हत्या
आंध्र प्रदेशमधील पालनाडू जिल्ह्यामधील संपत्तीच्या लालसेतून हत्येची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने वडिलांचं निवृत्तीवेतन आणि मालमत्तेवरील कब्ज्यासाठी आपल्याच दोन भावांची हत्या केली. ही घटना नेकरिकल्लू गावात घडली. येथे एका २८ वर्षीय महिलेने तिच्या दोन भावांची हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.
पालनाडू जिल्ह्याचे एसपी के. श्रीनिवास यांनी सांगितले की, आपले भाऊ वडिलांची मालमत्ता आणि निवृत्तीवेतनावर कब्जा करतील, अशी भीती आरोपी महिलेला वाटत होती. त्यामुळे तिने ही संपत्ती बळकावण्यासाठी आपल्या दोन्ही भावांची हत्या केली. त्यासाठी आरोपी महिला कृष्णवेनी हिने आपल्या भावांना दारू पाजली. त्यानंतर ओढणीने गळा आवळून त्यांची हत्या केली. मृत भावांमधील मोठे भाऊ गोपी कृष्णा (३२) हे पोलीस कॉन्स्टेबल होते. तर छोट्या भावाचं वय २६ वर्षे होते.
आरोपी बहीण कृष्णवेनी हिने २६ नोव्हेंबर रोजी छोट्या भावाची हत्या केली. त्यानंतर १० डिसेंबर रोजी तिने मोठ्या भावाचाही जीव घेतला. हत्येनंतर आरोपी महिलेने भावांचे मृतदेह काालव्यात फेकले. या सर्व हत्याकांडात कृष्णवेनी हिला तिच्या चुलत भावांनी मदत केली. तसेच मृतदेह दुचाकीवरून नेत त्यांची विल्हेवाट लावली.
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाचा तपास वेगाने केला जात असून, आरोपी महिलेला अटक करून तिची चौकशी केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, लोक या घटनेमुळे बहीण भावांच्या नात्याला कलंक लागल्याचा आरोप करत आहेत.