धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:48 IST2026-01-02T12:46:41+5:302026-01-02T12:48:33+5:30
महिला कैद्यांच्या संख्येत भारत जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याआधी अमेरिका, चीन, ब्राझील, रशिया व थायलंडचा समावेश होतो.

एआय इमेज
नवी दिल्ली : महिला कैद्यांच्या वाढत्या संख्येने आता चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर क्राइम अँड जस्टिस पॉलिसी रिसर्च’च्या ताज्या ‘वर्ल्ड फिमेल इम्प्रिझनमेंट लिस्ट’ अहवालानुसार, दोन दशकांत भारतीय तुरुंगांतमहिलांच्या संख्येत वाढ होण्याचा वेग पुरुषांच्या, सामान्य लोकसंख्या वाढीपेक्षा दुपट आहे. महिला कैद्यांच्या संख्येत भारत जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याआधी अमेरिका, चीन, ब्राझील, रशिया व थायलंडचा समावेश होतो.
दोन दशकांची आकडेवारी काय सांगते ?
अहवालातील आकडेवारीनुसार, २००० ते २०२२ दरम्यानची भारतीय तुरुंगांमधील महिला कैद्यांची (न्यायाधीन आणि शिक्षा झालेले दोन्ही) स्थिती खालीलप्रमाणे आहे :
महिला कैद्यांची वाढ : २००० साली ही संख्या ९,०८९ होती, जी २०२२ पर्यंत २३,७७२ वर पोहोचली आहे (अंदाजे १६२% वाढ).
पुरुष कैद्यांची वाढ : याच काळात पुरुष कैद्यांची संख्या ३,१०,३१० वरून ५,४९,३५१ झाली आहे (एकूण ७७% वाढ).
लोकसंख्या वाढ : या काळात भारताची एकूण लोकसंख्या अंदाजे ३०% नी वाढली आहे. महिला कैद्यांच्या तुलनेत वाढ कमीच.
महिला कैद्यांची संख्या कुठे जास्त?
अमेरिका १,७४,६०७
चीन १,४५,०००
ब्राझील ५०,४४१
भारत २३,७७२
वाढीची मुख्य कारणे काय आहेत?
तज्ज्ञांच्या मते, गुन्हेगारीच्या स्वरूपात होत असलेल्या बदलांमुळे ही संख्या वाढत आहे.
संघटित गुन्हेगारी : संघटित गुन्हेगारी व टोळ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे.
अमली पदार्थ तस्करी : ड्रग्स तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये महिलांचे प्रमाण वाढत आहे.
न्यायालयीन भूमिका : गुन्ह्याचे गांभीर्य पाहून महिलांनाही कठोर शिक्षा सुनावली जाते.
घुसखोरी : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेमुळे कैद्यांची संख्या वाढली.
तुरुंगात महिलांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी त्यांना मिळणाऱ्या सुविधा अजूनही अपुऱ्या आहेत.