धक्कादायक! मोबाईलला रेंज येत नव्हती, इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक १७ व्या मजल्यावरून पडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:32 IST2026-01-04T12:32:05+5:302026-01-04T12:32:42+5:30
Ajay Garg IOC ED death: नोएडातील सेक्टर-१०४ मध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक अजय गर्ग यांचा १७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही आत्महत्या आहे की अपघात? वाचा सविस्तर बातमी.

धक्कादायक! मोबाईलला रेंज येत नव्हती, इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक १७ व्या मजल्यावरून पडले...
नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक अजय गर्ग यांचा सेक्टर-१०४ मधील एका हायराईज सोसायटीच्या १७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अजय गर्ग हे सेक्टर-१०४ मधील 'एटीएस वन हॅम्लेट' सोसायटीत आपल्या पत्नीसोबत राहत होते. शनिवारी सकाळी १०:२० च्या सुमारास ते घराच्या बाल्कनीमध्ये मोबाईलवर बोलत होते. घरात नेटवर्क येत नसल्यामुळे ते बाल्कनीमध्ये गेले होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. फोनवर बोलत असतानाच त्यांचा तोल गेला की त्यांनी उडी मारली, याबाबत अद्याप संभ्रम आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
सोसायटीतील रहिवाशांनी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहताच तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सेक्टर-३९ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
अजय गर्ग हे मूळचे कानपूरचे रहिवासी असून ते दिल्लीतील इंडियन ऑईलच्या कार्यालयात कार्यरत होते. त्यांचा मुलगा मुंबईत नोकरी करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून कोणतीही 'सुसाईड नोट' मिळालेली नाही.
अपघात की आत्महत्या?
पोलिस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. "आम्ही सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी करत आहोत. हा अपघात आहे की आत्महत्या, हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर आणि सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.