धक्कादायक घटना! भेसळयुक्त दुधामुळे किडनी फेल, चार जणांचा मृत्यू, १२ जण रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:25 IST2026-02-24T13:11:34+5:302026-02-24T13:25:03+5:30
भेसळयुक्त दूध खाल्ल्याने मोठ्या संख्येने गावकरी आजारी पडले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ४८ तासांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तपास पथक नमुने गोळा करत आहे.

धक्कादायक घटना! भेसळयुक्त दुधामुळे किडनी फेल, चार जणांचा मृत्यू, १२ जण रुग्णालयात दाखल
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमुंद्री भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या ४८ तासांत किडनीशी संबंधित आजाराने चार जणांचा मृत्यू झाला आहे. इतर बारा जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व बाधित व्यक्तींचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. पीडितांनी भेसळयुक्त दूध सेवन केले होते. भेसळयुक्त दूध सेवन केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि चौघांचा मृत्यू झाला. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पवन हंस हेलिकॉप्टर उड्डाणानंतर काही वेळातच समुद्रात कोसळले; ७ जण प्रवास करत होते
तपास अधिकाऱ्यांनी कोरुकोंडा मंडळातील नरसापुरम गावातील एका दूध विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याचा बेकायदेशीर डेअरी युनिट देखील जप्त करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या विक्रेत्याकडून दूध घेणाऱ्या १०५ कुटुंबांपैकी ७५ कुटुंबांचे नमुने घेण्यात आले आहेत. संशयास्पद आजाराचे कारण निश्चित करण्यासाठी चाचणी सुरू आहे.
विजयवाडा येथील विशेष पथके परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी आणि वैद्यकीय आणि बचाव उपाययोजनांवर देखरेख करण्यासाठी राजमुंद्री येथे दाखल झाली आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांसोबत आपत्कालीन आढावा बैठक घेतली आणि पीडितांना चांगले उपचार मिळावेत यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले.
नमुन्यांची चाचणी
जिल्हा प्रशासनाला माहिती मिळताच, प्रभावित भागातील पाण्याचे नमुने प्रथम तपासण्यात आले. जेव्हा हे नमुने सुरक्षित असल्याचे आढळले, तेव्हा तपासाची दिशा बदलली. बाधित कुटुंबांमध्ये एकच लिंक जुळण्यात आली, ते सर्व एकाच विक्रेत्याने पुरवलेले दूध वापरत होते. तेव्हापासून, भेसळयुक्त दुधाच्या दृष्टिकोनातून तपास केला जात आहे.