नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:28 IST2025-10-30T16:20:43+5:302025-10-30T16:28:53+5:30
पोलीस तपासानुसार, अपघातानंतर युवकाचा मृतदेह एका ट्रकला अडकला आणि तो महामार्गावर सुमारे ११ किलोमीटरपर्यंत फरफटत गेला.

नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
हरियाणातील नारनौल येथे बुधवारी रात्री उशिरा झालेल्या एका अपघाताने संपूर्ण परिसरच हादरला आहे. या अपघातात एका २२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह अपघातस्थळापासून तब्बल ११ किलोमीटर दूर सापडला आहे. पोलीस तपासानुसार, अपघातानंतर युवकाचा मृतदेह एका ट्रकला अडकला आणि तो महामार्गावर सुमारे ११ किलोमीटरपर्यंत फरफटत गेला.
दुचाकी डिव्हायडरवर आदळली अन्...
मृत तरुणाचे नाव अभिषेक असून, तो महेंद्रगड जिल्ह्यातील चितलांग गावचा रहिवासी आहे. तो नारनौलमधील एका पेंट कंपनीत काम करत होता. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास तो आपला चुलत भाऊ प्रमोदसह दुचाकीवरून गावाकडे निघाला होता. लहरोदा गावाजवळ त्यांची दुचाकी डिव्हायडरवर आदळली. या धडकेत अभिषेक रस्त्यावर पडला, तर प्रमोद दुसऱ्या बाजूला फेकला गेला. स्थानिक नागरिकांनी जखमी प्रमोदला तत्काळ नागरिक रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारानंतर त्याला शुद्ध आली.
अभिषेक अपघातानंतर लाल रंगाच्या ट्रकला अडकला -
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी मंढाणा गावाजवळ हेल्मेट घातलेल्या एका युवकाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडल्याने खळबळ उडाली. तो अभिषेक होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, समोर आले की, अभिषेक अपघातानंतर लाल रंगाच्या ट्रकला अडकला होता आणि ट्रकचालकाने वाहन थांबवण्याऐवजी पुढे नेले.
सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी सतबीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध शोधमोहीम सुरू केली आहे. या भयावह घटनेने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.