वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:12 IST2026-01-02T09:10:32+5:302026-01-02T09:12:01+5:30
घरात वाढदिवसाची तयारी, पण बाथरूममध्येच घुसमटला मुनमुनचा श्वास; वाचा नेमकं काय घडलं...

वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
ज्या घरात काही तासांत आनंदाचा सोहळा रंगणार होता, जिथे पाहुण्यांची वर्दळ आणि हसण्या-खिदळण्याचे आवाज येणार होते, तिथे अचानक काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश ऐकू आला. पंजाबमधीलशिवसेना नेते दीपक कंबोज यांची २२ वर्षीय मुलगी मुनमुन चितवान हिचा तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच बाथरुममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने कंबोज कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वाढदिवसाच्या अंघोळीला गेली आणि परतलीच नाही
मुनमुनचा २२ वा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. संध्याकाळी होणाऱ्या सेलिब्रेशनसाठी नातेवाईक आणि मित्र-मंडळींना बोलावण्यात आले होते. मुनमुन तयारीसाठी बाथरूममध्ये अंघोळीला गेली होती. मात्र, बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. दरम्यान, बाथरूममधून गॅस बाहेर येत असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. संशय आल्याने घरच्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
दरवाजा तोडला तेव्हा उशीर झाला होता...
धास्तावलेल्या कुटुंबाने तात्काळ बाथरूमचा दरवाजा तोडला. आत पाहताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुनमुन तिथे बेशुद्धावस्थेत पडली होती. गॅस गिझरमधून कार्बन मोनोऑक्साइड गॅसची गळती झाल्याने संपूर्ण बाथरूममध्ये धूर साचला होता आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्याने मुनमुनचा श्वास गुदमरला होता. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
गॅस गिझर ठरला 'सायलेंट किलर'
प्राथमिक अंदाजानुसार, गॅस गिझरमध्ये बिघाड झाल्याने गॅसची गळती झाली. बाथरूम बंद असल्याने ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि विषारी कार्बन मोनोऑक्साइडमुळे मुनमुन बेशुद्ध पडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून गुरुवारी तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हसत्या-खेळत्या मुलीच्या जाण्याने हळहळ
दीपक कंबोज यांनी अत्यंत जड अंतःकरणाने सांगितले की, "मुनमुन खूप सुशिक्षित आणि मनमिळावू होती. तिच्या वाढदिवसासाठी आम्ही मोठी तयारी केली होती, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते." मुनमुनच्या जाण्याने जालंधरमधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.