शिवसेना अखेर रालोआतून बाहेर; संसदेत बसणार विरोधी बाकांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 03:44 AM2019-11-18T03:44:40+5:302019-11-18T06:16:02+5:30

युतीचा अधिकृत काडीमोड; अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीवरून सरकारला धरणार धारेवर

Shiv Sena finally out of nda going to sit on Opposition benches Parliament | शिवसेना अखेर रालोआतून बाहेर; संसदेत बसणार विरोधी बाकांवर

शिवसेना अखेर रालोआतून बाहेर; संसदेत बसणार विरोधी बाकांवर

googlenewsNext

नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून भाजपशी बिनसल्यानंतर शिवसेना आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) अधिकृतरीत्या बाहेर पडली असून शिवसेनेचे खासदार संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच, लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी बाकांवर बसणार आहेत. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती रविवारी प्रसारमाध्यमांना दिली.

२०१४ चा अपवाद वगळता सलग २५ वर्षे शिवसेना-भाजपची युती होती. नुकतीच झालेली विधानसभा आणि त्याअगोदरची लोकसभा निवडणूकही हे दोन्ही पक्ष युती करूनच लढले. मात्र महाराष्ट्रातील सत्तेच्या समान वाटपावरून या दोन्ही पक्षांचे बिनसले आहे. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याची मागणी भाजप नेतृत्वाने अमान्य केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याशी काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधले. काँग्रेस आघाडीसोबत सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू होताच केंद्रातील मोदी सरकारमध्ये असलेले शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी गेल्या सोमवारी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या एनडीएच्या बैठकांना ते उपस्थित राहिले नाहीत.

या घडामोडीनंतरही शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा शिवसेना किंवा भाजप नेत्यांनी केलेली नव्हती. मात्र संसदेतील दोन्ही सभागृहांत शिवसेनेला विरोधी बाकावर जागा देण्यात आल्याने त्यावर आता भाजपकडूनच शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेच्या खासदारांना आजवर संसदेतील दोन्ही सभागृहांत सत्तापक्षाची जागा देण्यात आली होती. मात्र, त्यांची आसनव्यवस्था आता बदलण्यात आली आहे. त्यांची व्यवस्था विरोधी पक्षात केली आहे, असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचेच सरकार येईल, असे आपणास अमित शहा यांनी सांगितल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

फडणवीसांच्या विरोधात घोषणाबाजी
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रविवारी शिवसैनिकांची अलोट गर्दी झाली होती. नव्या राजकीय समीकरणांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर दुपारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले. मात्र, फडणवीस यांना संतप्त शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 'मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...' अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.

शरद पवार-सोनिया गांधी यांची आज भेट
महाराष्ट्रातील सत्तापेच सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी भेट घेणार आहेत. या भेटीनंतर मंगळवारी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुणे येथे दिली.

Web Title: Shiv Sena finally out of nda going to sit on Opposition benches Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.