पतीसोबतचं नातं सुधारण्यासाठी जादूटोणा करायला गेली आणि मांत्रिकासोबतच पसार झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:20 IST2026-02-11T13:15:24+5:302026-02-11T13:20:31+5:30
Madhya Pradesh Crime News: पतीसोबतचं नातं सुधरावं यासाठी मांत्रिकाकरवी जादूटोणा करवून घेणारी महिला काही काळाने त्याच मांत्रिकासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पतीसोबतचं नातं सुधारण्यासाठी जादूटोणा करायला गेली आणि मांत्रिकासोबतच पसार झाली
आजच्या बदलत्या काळात कौटुंबिक नात्यात मतभेद, पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशावेळी नातं टिकवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. काही जण त्यासाठी जादूटोण्यासारखे अघोरी उपायही करतात. मात्र कधीकधी त्यामधून धक्कादायक घटनाही घडतात. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील इंदूर येथून समोर आली आहे. येथील बाणगंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला अचानक सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन घरातून गायब झाली. ती अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला, त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासामधून सदर महिला ही एका मांत्रिकासोबत फरार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सदर महिलेला भोपाळ येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना एसीपी रुबिना मिजबानी यांनी सांगितले की, सदर महिला बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांना गांभीर्याने तपास सुरू केला. सर्वप्रथम महिलेचा पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे जबाब नोंदवले. दरम्यान, महिलेचा पती आणि कुटुंबातील इरत सदस्यांच्या जबाबांमध्ये तफावत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत या महिलेचा ठावठिकाणा शोधून काढला.
यात सदर महिला भोपाळमध्ये असल्याचं आढळून आलं. त्यानंतर इंदूर पोलिसांच्या पथकाने भोपाळ येथे जाऊन तिला ताब्यात घेतले. तसेच तिच्याकडून सोन्या-चांदीचे काही दागिनेही जप्त करण्यात आले. सध्या या महिलेकचे अधिक तपास केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या महिलेने सांगितले की, तिच्या पतीमुळे ती बऱ्याच काळापासून त्रस्त होती. याचदरम्यान, तिची ओळख राकेश जाटव नावाच्या तरुणासोबत झाली. तो मांत्रिक विधी आणि पूजा करण्याचं काम करायचा. कौटुंबिक समस्यांबाबत राकेशकडून पूजाविध करवून घेत असताना आमच्यामधील बोलचाल वाढली, तसेच आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. त्यानंतर कौटुंबिक ताणतणावांना कंटाळून मी राकेशसोबत जाण्याचा निर्णय घेतला.