लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 11:27 IST2025-10-31T11:27:38+5:302025-10-31T11:27:58+5:30
शारदा नावाच्या या महिलेने तिचा लिव्ह-इन पार्टनर राहुल जाटव याच्यासोबत मिळून हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्हा रुग्णालयाच्या मेटरनिटी वॉर्डमधून एका नवजात बाळाचे अपहरण झाल्याच्या घटनेने बुधवारी एकच खळबळ उडाली होती. मात्र, शिवपुरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावत केवळ बाळालाच सुखरूप परत मिळवले नाही, तर या मागील एका धक्कादायक कटाचाही पर्दाफाश केला आहे. या अपहरणामागे शारदा नावाच्या महिलेचा हात असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिलेने हे कृत्य तिच्या चौथ्या प्रियकराच्या सांगण्यावरून केले आहे.
शारदा नावाच्या या महिलेने तिचा लिव्ह-इन पार्टनर राहुल जाटव याच्यासोबत मिळून हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाले आहे. या राहुलने बाळाचा सौदा केला होता, त्यासाठीच हे अपहरण करण्यात आले, असे शारदाने पोलिसांना सांगितले आहे.
बाळ चोरीचा मास्टरमाईंड राहुल जाटव!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शारदा गेल्या एका वर्षापासून उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील महरौनी येथे राहुल जाटवसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. शारदाने चौकशीदरम्यान सांगितले की, बाळाच्या अपहरणाचा संपूर्ण कट राहुल जाटवनेच रचला होता. विशेष म्हणजे, राहुलने हे बाळ पुढे कुणालातरी विकण्याचा व्यवहार केला होता, पण तो नेमका कुणाला विकणार होता, याची माहिती तिला नसल्याचे तिने सांगितले.
प्रेमप्रकरणांची मालिका अन् अपहरण…
शारदाच्या वैयक्तिक आयुष्याची कहाणीही तितकीच धक्कादायक आहे. कोतवाली प्रभारी टीआय कृपाल सिंह राठौड़ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदाने यापूर्वी तिचा पहिला पती राम अवतार याला सोडले होते. त्यानंतर तिचे मोगिया नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. यानंतर ती दुसऱ्या एका ठाकूर नावाच्या व्यक्तीसोबत राहत होती. आता महरौनीमध्ये ती राहुल जाटवसोबत चौथे प्रेमप्रकरण करत होती.
पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने शारदाची आई हीरोबाई आणि बहिणी लक्ष्मी व अनरू यांच्यापर्यंत पोहोचून तिचा मोबाईल नंबर मिळवला आणि आरोपीला सागर येथे ताब्यात घेतले.
एक चूक झाली अन्...
शारदा बाळाला घेऊन बसने महरौनीला जाणार होती, पण ती त्या भागाशी फारशी परिचित नसल्याने ती महरौनी येथे उतरण्यास विसरली आणि बस थेट सागरपर्यंत पोहोचली. त्यामुळे ती पोलिसांच्या हाती लागली आणि बाळाचे प्राण वाचले. जर ती महरौनीला उतरली असती, तर हे बाळ मिळणे खूप कठीण झाले असते, असे पोलिसांनी सांगितले.
आमना-सामना होणार!
पोलिसांनी गुरुवारी शारदाला न्यायालयात हजर करून तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे. तसेच, राहुल जाटवलाही गुरुवारी उशिरा अटक करण्यात आली असून त्याला शिवपुरी आणले जात आहे. हे चाइल्ड ट्रॅफिकिंगचे हे प्रकरण असल्याने, पोलीस आता दोघांनाही समोरासमोर बसवून कसून चौकशी करणार आहेत, त्यानंतरच या अपहरण आणि बाल तस्करीच्या कटामागचे संपूर्ण सत्य बाहेर येईल.