तीनवेळा पळाली, चौथ्यांदा मानलीच नाही; अखेर मोठ्या मनाने पतीनेच लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:50 IST2026-02-19T13:45:46+5:302026-02-19T13:50:08+5:30
वारंवार प्रियकराकडे पळून जाणाऱ्या पत्नीच्या हट्टापुढे अखेर पतीने हार मानली. रागावण्याऐवजी पतीने चक्क मोठेपण दाखवत पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले.

तीनवेळा पळाली, चौथ्यांदा मानलीच नाही; अखेर मोठ्या मनाने पतीनेच लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
"प्रेम आंधळं असतं" असं म्हणतात, पण बागपतमध्ये घडलेल्या एका घटनेने प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली आहे. वारंवार प्रियकराकडे पळून जाणाऱ्या पत्नीच्या हट्टापुढे अखेर पतीने हार मानली. समाजात होणारी बदनामी आणि पत्नीचा टोकाचा निर्धार पाहून, रागावण्याऐवजी पतीने चक्क मोठेपण दाखवत स्वतःच्या पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले. या अजब 'विदाई'ची चर्चा आता संपूर्ण उत्तर प्रदेशात रंगली आहे.
फेसबुकवर जुळले सूत, दोन मुलांकडेही फिरवली पाठ
मुजफ्फरनगरच्या २३ वर्षीय सोनीची ही कहाणी आहे. सोनीचा विवाह तीन वर्षांपूर्वी सहारनपूरच्या पीरू नावाच्या तरुणाशी झाला होता. या संसारातून त्यांना दोन लहान मुलेही आहेत. मात्र, वर्षभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून सोनीची ओळख बागपतच्या २१ वर्षीय हरीशशी झाली. मोबाईलच्या स्क्रीनवर सुरू झालेली ही मैत्री कधी प्रेमात बदलली, हे कोणालाच कळले नाही. हे प्रेम इतके अंगात भिनले होते की, सोनीने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा आणि सुखी संसाराचा विचारही बाजूला सारला.
तीनवेळा पलायन, चौथ्यांदा पोलीस ठाण्यात पंचायत
सोनी यापूर्वीही तीनवेळा आपले घर सोडून हरीशकडे बागपतला पळून आली होती. प्रत्येक वेळी तिची समजूत काढून, सामाजिक प्रतिष्ठेचा हवाला देऊन तिला परत पाठवले जात होते. मात्र, चौथ्यांदा जेव्हा ती पुन्हा बागपतला पोहोचली, तेव्हा तिने 'आता माघार नाही' असा पवित्रा घेतला. प्रकरण बागपत कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे पोलीस, नातेवाईक आणि पती पीरू यांच्यासमोर तासनतास पंचायत चालली. नातेवाईकांनी मुलांची दुहाई दिली, समाजाचा धाक दाखवला, पण सोनी "राहीन तर फक्त हरीशसोबतच" या निर्णयावर ठाम राहिली.
पतीचा ऐतिहासिक निर्णय अन् मंदिरात विवाह
पत्नीचा हट्ट आणि तिचे हरीशवरील प्रेम पाहून पती पीरूने अखेर एक मोठा निर्णय घेतला. त्याने सार्वजनिकरीत्या सोनीला तिच्या प्रियकरासोबत जाण्याची परवानगी दिली. "जर तिला माझ्यासोबत सुखी राहायचे नसेल, तर तिने तिच्या आवडीच्या व्यक्तीसोबत राहावे," असे म्हणत पतीने या नात्याला संमती दिली. पोलीस ठाण्यात दोघांचेही जबाब नोंदवण्यात आले आणि त्यानंतर सायंकाळी एका मंदिरात सोनी आणि हरीश यांचा रीतसर विवाह लावून देण्यात आला.