डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पतींनी घरगुती जबाबदाऱ्या वाटून घेणे ही काळाची गरज आहे. असे केल्याने ते काही उपकार करत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यातून न्यायालयाने बदलत्या सामाजिक मूल्यांची जाणीव आणि समतेवर आधारित वैवाहिक नात्याची गरज अधोरेखित केली आहे.
२०१७ मध्ये विवाह झालेल्या दाम्पत्याला आठ वर्षांचा मुलगा आहे. पती सरकारी शाळेत शिक्षक असून, पत्नी महाविद्यालयात प्राध्यापिका आहे आणि व्यावसायिकदृष्ट्या पतीपेक्षा अधिक सक्षम आहे. पतीने कुटुंब न्यायालयात क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पतीचा आरोप आहे की, विवाहानंतर अवघ्या आठवडाभरात पत्नीच्या वागणुकीत मोठा बदल झाला. पती व त्याच्या घरच्यांशी अपमानास्पद भाषा वापरू ती लागली. तिने घरच्यांसाठी स्वयंपाक करण्यास नकार दिला.
घरगुती जबाबदाऱ्या दोघांनी पार पाडल्या पाहिजेत
याउलट पत्नीने दावा केला की, ती पती व कुटुंबीयांच्या संमतीने बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. मात्र, त्यांनी बारशाला उपस्थिती लावली नाही आणि तिच्या आई-वडिलांकडून रोख रक्कम व सोन्याची मागणी केली. तिच्या पगारातून तिला जबरदस्तीने पैसे द्यावे लागत असत. कुटुंब न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. मात्र, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही स्पष्ट शब्दांत सांगितले की, वैवाहिक जीवनामध्ये घरगुती जबाबदाऱ्या दोघांनीही समानपणे पार पाडल्या पाहिजेत.
काळ बदलला आहे
तुम्ही नोकराणीशी नाही, तर जीवनसाथीशी विवाह करत आहात, असे न्या. संदीप मेहता यांनी म्हटले आहे. यात न्या. विक्रम नाथ यांनी भर घातली. काळ बदलला आहे. पतींनीही घरकामात सक्रिय सहभाग घ्यायला हवा. आजचा काळ वेगळा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पत्नीने स्वयंपाक किंवा घरकाम न करणे हे क्रूरतेचे लक्षण ठरत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले.
Web Summary : Supreme Court emphasizes shared household responsibilities in marriage. Refusal to cook isn't cruelty. A professor sought divorce, alleging cruelty, but the court stressed equality. Husbands must actively participate in housework; times have changed.
Web Summary : सुप्रीम कोर्ट ने विवाह में घर के कामकाज को साझा करने पर जोर दिया। खाना बनाने से इनकार करना क्रूरता नहीं है। एक प्रोफेसर ने क्रूरता का आरोप लगाते हुए तलाक मांगा, लेकिन कोर्ट ने समानता पर जोर दिया। पतियों को घर के काम में सक्रिय रूप से भाग लेना चाहिए; समय बदल गया है।