भांडी घासतो, भजी तळतो, तुमची दाढीही करतो; पण मत नक्की द्या...; पश्चिम बंगालमध्ये मतांसाठी वाट्टेल ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 08:56 IST2026-04-02T08:56:25+5:302026-04-02T08:56:48+5:30

प्रचारमोहिमेत विचारसरणीची नव्हे तर कौशल्यांचीही स्पर्धा

Shaving Beards to Frying Pakoras West Bengal Candidates Turn to Odd Jobs for Votes | भांडी घासतो, भजी तळतो, तुमची दाढीही करतो; पण मत नक्की द्या...; पश्चिम बंगालमध्ये मतांसाठी वाट्टेल ते

भांडी घासतो, भजी तळतो, तुमची दाढीही करतो; पण मत नक्की द्या...; पश्चिम बंगालमध्ये मतांसाठी वाट्टेल ते

कोलकाता: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उमेदवार मतांसाठी काय वाट्टेल ते करताहेत. एका उमेदवाराने एका घरात भांडी घासली, दुसऱ्याने एका वृद्ध महिलेसाठी पाण्याच्या बादल्या वाहिल्या, तर तिसऱ्या उमेद‌वाराने रस्त्यावरील एका सलूनमध्ये जाऊन एका मतदाराची दाढी केली.

संपूर्ण राज्यभर, निवडणुकीचा प्रचार हा आता केवळ भाषणांची स्पर्धा न राहता, राजकीय जवळीक साधण्याची एक स्पर्धा बनला आहे. यातून प्रत्येक उमेदवार एकच संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की, मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही, तर मी तुमच्यापैकीच एक आहे.

हुगळी जिल्ह्यातील 'गोगट' भागात, तृणमूलचे उमेदवार निर्मल माझी 'बाहेरचा माणूस' म्हणून होणारी नेहमीची टीका वा टोमणे, आपल्यासाठी राजकीय अडचण ठरू नये याबद्दल काळजी घेत असल्याचे दिसते. एका घरात त्यांनी स्वयंपाकाची पळी हातात घेतली व चुलीवर ठेवलेल्या पातेल्यातील पदार्थ ढवळला. दुसऱ्या एका घरात, ते जमिनीवर बसले आणि त्या कुटुंबासोबत डाळ, माशांची करी आणि भात असा आहारही ग्रहण केला.

वस्तराच घेतला हाती...

आरामबागमध्ये, तृणमूलच्या उमेदवार मीता बाग यांनी रस्त्यावरील एका खानावळीत प्रवेश केला; त्यांनी कढईत उकळणाऱ्या तेलात भजी तळली, ती कागदी पुड्यांमध्ये बांधली आणि काही ग्राहकांना भजी विकलीही.... नारायणगडमध्ये, भाजपचे उमेदवार रामप्रसाद गिरी हे प्रचारादरम्यान एका सलूनमध्ये गेले. तिथे दाढी करून घेण्यासाठी एक ग्राहक बसला होता. खुद्द उमेदवारानेच वस्तरा हातात घेत त्याची दाढी करण्यास सुरुवात केली.

शेतात कामही केले... पाणी भरले...

पुरसुरामध्ये, भाजपचे उमेदवार विमान घोष यांनी आपला प्रचार थेट शेतात नेला, जिथे ते शेतकऱ्यांसोबत नांगरणीच्या कामात सहभागी झाले. 'पुरसुराह' भागात, तृणमूलचे उमेदवार पार्थ हजारी यांचा प्रचारदौरा काही काळासाठी चक्क घरगुती कामात रूपांतरित झाल्याचे दिसून आले. चाटनामध्ये, भाजपचे उमेदवार सत्यनारायण मुखोपाध्याय यांनीही रस्त्यावरील खानावळीत भजी तळून, मीता बाग यांची जवळपास तंतोतंत बरोबरी केली. दुर्गापूर पश्चिममध्ये, भाजपचे उमेदवार लक्ष्मण घोरुई यांनी निशाणहाट परिसरात रस्त्यावरील एका नळावरून पाणी भरण्यासाठी थडपडणारी एक वृद्ध महिला दिसली. घोरुई तिथे थांबले, त्यांनी स्वतः दोन बादल्या भरल्या. त्या वाहून त्या महिलेच्या घरापर्यंत पोहोचवल्या. आतापर्यंत ही प्रचारमोहीम केवळ विचारसरणीचीच नव्हे, तर स्वयंपाकाच्या कौशल्यांचीही एक स्पर्धा बनल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title : पश्चिम बंगाल चुनाव: वोट के लिए उम्मीदवार कुछ भी करने को तैयार!

Web Summary : पश्चिम बंगाल में उम्मीदवार वोट पाने के लिए हर मुमकिन कोशिश कर रहे हैं। वे खाना बना रहे हैं, घर के कामों में मदद कर रहे हैं, और यहां तक कि बाल भी काट रहे हैं, यह दिखाते हुए कि वे लोगों में से एक हैं। उम्मीदवार मतदाताओं से व्यक्तिगत स्तर पर जुड़ने के लिए उत्सुक हैं।

Web Title : West Bengal Elections: Candidates cook, shave, anything for votes!

Web Summary : West Bengal candidates are going all out for votes. They're cooking, helping with chores, and even offering haircuts, showing they're one of the people. Candidates are eager to connect with voters on a personal level.